महत्वाचा निर्णय; 'त्या' वन कर्मचाऱ्यांच्या वारसांना २५ लाख, नोकरीही मिळणार

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्वाचे निर्णय घेण्यात आले, जाणून घ्या सविस्तर
Maharashtra Cabinet Meeting News
Maharashtra Cabinet Meeting NewsSAAM TV
Published On

Forest Department Employee | मुंबई : वनांचे संरक्षण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आता पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणेच वन कर्मचाऱ्यांनाही लाभ मिळणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आज, मंगळवारी झालेल्या बैठकीत या विषयीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.

वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, 'देशातील नागरी संपत्तीप्रमाणेच वने (Forest) व वन्यजीव ही वन संपत्ती खूप महत्वाची आहे. नागरी संपत्तींचे आणि मनुष्यांचे संरक्षण करताना जीव धोक्यात घालण्याऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सरकारतर्फे विविध लाभ देण्यात येतात. तसेच वनांचे संरक्षण करताना जीव धोक्यात घालणाऱ्या वन (Forest Officer) कर्मचाऱ्यांनाही लाभ मिळावेत, ही वन कर्मचाऱ्यांची मागणी काही वर्षे प्रंलबित होती.'

वन कर्मचाऱ्यांनाही अनेक धोक्यांना तोंड द्यावे लागते. वणवे नियंत्रणात आणताना, शिकार रोखताना, वनांतील वृक्षचोरी वा अन्य प्रकारची चोरी रोखताना, जखमी किंवा मानवी वस्तीत शिरलेले वन्य प्राणी वाचविताना वन कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका असतो. अनेकदा नैसर्गिक आपत्तींना वन कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागते. अशा प्रकारात अनेकदा वन कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका असतो किंवा ते गंभीर जखमी होवून कायमचे दिव्यांगत्व येण्याचा धोका असतो, असे मुनगंटीवार म्हणाले.

Maharashtra Cabinet Meeting News
कितीही अफझल खान आले तरी घाबरणार नाही, विजय आपलाच आहे; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा

..तर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना २५ लाख

वन विभागाच्या प्रस्तावानुसार वनांचे व वन्यप्राण्यांचे संरक्षण करताना दुदैवाने वन कर्मचारी मृत्युमुखी पडल्यास अशा मृत वन कर्मचाऱ्याच्या वारसास २५ लाख रूपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. त्याचप्रमाणे अशाप्रकारे कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर प्राधान्याने नोकरी देण्यात येईल.

जर वारस नोकरी करण्यास सक्षम नसेल किंवा वारसाने नोकरी नाकारली तर सदर मृत वन कर्मचाऱ्याच्या नियत सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतचे वेतन सदर कुटुंबाला देण्यात येईल. तसेच कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या पार्थिवाचे कुटुंबाने ठरवलेल्या ठिकाणपर्यंतचे रस्ते/रेल्वे/विमान इत्यादीमार्गे वहनाचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.

Maharashtra Cabinet Meeting News
राज्यातील शिवभोजन थाळी योजना सुरूच राहणार; शिंदे सरकारचा गोरगरीब जनतेला मोठा दिलासा

कर्तव्य बजावताना वन कर्मचारी जर कायमचा दिव्यांग झाला तर, त्या वन कर्मचाऱ्यास श्रेणीप्रमाणे ३ लाख ६० हजार रुपये ते ३ लाख इतकी रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येईल. अशा प्रकारे कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या वन कर्मचाऱ्याचा उपचारांचा संपूर्ण खर्च सरकार करेल, अशीही माहिती देण्यात आली.

मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयामुळे वन कर्मचाऱ्यांना आता भरीव लाभ मिळणार आहे. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांचे नीतीधैर्य वाढेल, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com