गणेशोत्सवाचा आज नववा दिवस असून उद्या म्हणजे गुरुवारी बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. यासाठी गणेश मंडळांनी जय्यत तयारी सुरू केली असून बाप्पाच्या निरोपासाठी बँड पथक तसेच ढोल ताशा पथकाचा कसून सराव सुरू आहे. अशातच सांगलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगलीत डीजेच्या दणदणाटाने दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)
गणपती विसर्जन मिरवणुकीत लावण्यात आलेल्या डीजेचा तीव्र आवाज सहन न झाल्याने या तरुणांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे. शेखर सुखदेव पावशे (वय 32) आणि प्रवीण यशवंत शिरतोडे (वय 35) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
दोन्ही तरुणांचा मृत्यू वेगवेगळ्या ठिकाणी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तासगाव तालुक्यातील (Sangli News) कवठेएकंद गावात मिरवणुकी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी मंगळवारी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत शेखर सुखदेव पावशे हा तरुण नाचत होता.
नाचता-नाचता त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली कोसळला. मिरवणुकीत नाचत असलेल्या इतर लोकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. शेखरच्या मृत्युने कवठेएकंद गावावर शोककळा पसरली आहे.
दुसरी घटना सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आहे. येथील दुधारी गावात गणपतीची मिरवणूक सुरू असताना डीजेच्या दणदणाटाने प्रवीण यशवंत शिरतोडे या तरुणाला अस्वस्थ वाटू लागले. मिरवणुकीतच त्याला चक्कर आली. मित्रांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना प्रवीणचा मृत्यू झाला.
गणपती बाप्पाच्या मिरवणुकीतच (Ganeshotsav 2023) सांगली जिल्ह्यात दोन तरुणांचा डीजेच्या दणदणाटाने मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोन्ही घटनांमुळे न्यायालयाने ठरवून दिलेल्या डेसिबलपेक्षा अधिक आवाजाने स्पीकर वाजवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर, डीजे तसेच ढोलचा आवाज ३५ डेसिबलच्या आत ठेवूनच बाप्पाला निरोप द्यावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.