
पराग ढोबळे, साम टीव्ही
नागपूर : आगामी निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी जोरदारपणे मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अनेक पक्षांमध्ये इतर पक्षातील नेत्यांचा पक्षप्रवेश होत आहे. भाजपनेही आगामी निवडणुकीसाठी चांगली कंबर कसली आहे. मात्र, भाजपमधील इतर पक्षातील नेत्यांच्या इनकमिंगमुळे आता जुन्या कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या का? असा सवाल माजी आमदाराने भाजपच्या वरिष्ठांना केला आहे. माजी आमदार सुधीर पारवे यांनी भाजपच्या वरिष्ठांना पत्र लिहून भावना व्यक्त केल्या आहेत.
भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांचा विचार कोण करणार, असा सवाल भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे यांनी उपस्थित केला आहे. उमरेडचे माजी भाजप आमदार सुधीर पारवे यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलेल्या पत्रातून भावना व्यक्त केल्या आहेत. नुकतेच काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवे असो की विधानसभा निवडणुकीत भाजप सुधीर पारवे विरोधात काम करणारे असो या सगळ्या संदर्भात त्यांनी नाराजी बोलून दाखवली आहे.
'मागील काही काळापासून भाजपमध्ये इन्कमिंगचे प्रमाण वाढले आहे. नव्याने दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांना पद मिळत आहे. मात्र जुन्या कार्यकर्त्यांनी अजूनही सतरंज्या उचलायच्या का? असा सवाल पारवे यांनी उपस्थित केला. पक्षशिस्तीच्या नावाखाली ही सल कोणीही सार्वजनिकपणे बोलून दाखवत नाही. पण यामुळे पक्षाची पुढे चालून अधोगती होईल, असं म्हणत सुधीर पारवे यांनी नाराजी व्यक्त केली.
जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या मनातील भावना उघडपणे मांडल्या आहेत. कारवाई झाली तरी तयार आहे. पण माझा पक्ष आई वडिलांच्या भूमिकेत आहे. पक्षाने मला सर्व काही दिलं. पण पक्षाचं नुकसान होऊ नये, यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना भेटणार असल्याचेही पारवे यांनी सांगितलं.
'मी भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आणि माजी आमदार म्हणून सलग दहा वर्षे जनतेची सेवा केली. मात्र आज मनात जुन्या कार्यकर्त्यांबाबत एक व्यथा आहे. पक्ष उभारण्यात ज्यांनी दिवस रात्र झिजून घाम गाळला. त्या जुन्या आणि सामान्य कार्यकर्त्यांचा विचार कोणी करावा? असा सवाल पारवे यांनी उपस्थित केला आहे.
'कारवाईची भीती नाही, मात्र या सगळ्या बाबी श्रेष्ठींसमोर मांडणार आहे. त्यानंतरही जर काहीच होणार नसेल, तर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेऊन वेगळी भूमिका चर्चाही करून वेगळी दिशा ठरवू शकतो, असंही सुधीर पारवे यांनी बोलून दाखवलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.