

FDA ने महिनाभरात राज्यभर 904 धाडी टाकून मोठी कारवाई केली.
34.66 कोटी रुपयांचा प्रतिबंधित आणि भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला.
भेसळयुक्त अन्नपदार्थांवर 431 कारवाया करत 29.11 कोटींचा साठा जप्त.
संजय गडदे, साम प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासनाने (FDA) 25 मे ते 24 जून 2026 या कालावधीत राज्यभर व्यापक धडक मोहीम राबवत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि विनापरवाना व्यवसायांविरोधात मोठी कारवाई केली. या कालावधीत एकूण 904 धाडी टाकण्यात आल्या असून तब्बल 34 कोटी 66 लाख 90 हजार 624 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याविरोधात 446 कारवाया करण्यात आल्या. यात 5.55 कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून 457 जणांना अटक, 322 आस्थापना सील आणि 42 वाहने जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे व असुरक्षित अन्नपदार्थांवर 431 कारवाया करण्यात आल्या. आंबे, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मसाले, पॅकेज्ड पिण्याचे पाणी, खवा, बेकरी पदार्थ आणि इतर अन्नपदार्थांचा 29.11 कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
औषध विभागानेही राज्यभर 55 विशेष कारवाया करत 5.52 कोटी रुपयांच्या औषधे, वैद्यकीय उपकरणे, सौंदर्यप्रसाधने व इतर उत्पादनांवर जप्ती अथवा प्रतिबंधात्मक कारवाई केली. दिशाभूल करणाऱ्या औषध जाहिरातींविरोधात 31 कारवाया, विनापरवाना औषध व्यवसायाविरोधात 11 धाडी, तर एनडीपीएस कायद्यांतर्गत स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या.
या मोहिमेत एकूण 9 एफआयआर नोंदवण्यात आले असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर कृतीला पाठीशी घातले जाणार नसून अशा प्रकरणांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.