तोतया आयएएस कल्पना भागवतला छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक
पाक- अफगाणिस्तान संपर्क, लाखोंचे हॉटेल बिल आणि संशयित चॅटमुळे तपास गहिरा
१९ कोटींचा धनादेश, बनावट कागदपत्रे, परदेशी प्रवास उघड
राष्ट्रीय सुरक्षेचा धोका वाढल्याचा पोलिसांचा संशय
माधव सावरगावे, संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन दिवसांपूर्वी तोतया महिला आयएएस कल्पना भागवत हिला एका हॉटेलमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिची चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आले आहेत. तिच्या मोबाइलमध्ये पेशावर छावणी बोर्ड, अफगाणिस्तान ॲम्बेसीसह ११ आंतरराष्ट्रीय फोन नंबर मिळाले आहेत. तसेच, ७ वर्षांपासून दिल्लीत राहात असलेला तिचा अफगाणिस्तानचा मित्र मोहंमद अशरफ खिल याचा भाऊ गालिब यमा हा पाकिस्तानात राहात आहे. त्याच्यासोबत केलेले संशयित व्हाट्सॲप चॅटही पोलिसांना मिळाले आहे. तिच्या घरात १९ कोटींचा एक आणि ६ लाखांचा एक, असे दोन धनादेश आढळल्याने तपासाची गती आणखी वाढली आहे.
कल्पना भागवत हीचे शहरात स्वत:चे घर असताना सहा महिन्यांपासून पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी होती. तिच्याकडे खाडाखोड केलेले आधारकार्ड आणि २०१७ च्या आयएएस निकालाची यादी सापडली होती. तिला अटक केल्यावर सुरुवातीला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. बुधवारी तिच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर पोलीस पथकाने न्यायालयात हजर केले. कल्पना भागवत हिच्याकडे आईची २० हजार रुपये पेन्शन सोडता उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. तरीही ती वेळोवेळी विमानाने फिरली. सहा महिन्यांपासून पंचतारांकित हॉटेलमध्ये राहात आहे. हॉटेलमध्ये तिने ६ लाख ९६ हजार २०० रुपये बिल भरले आहे. एवढ्या मोठाल्या रकमा तिच्याकडे कोठून आल्या?, याचाही पोलीस तपास करीत आहेत.
आरोपी कल्पना भागवत ही अनेकदा विमानाने राजस्थान, जोधपूर, उदयपूर, मणिपूर, दिल्ली या भागात विमानाने फिरली आहे. तिचे विमानाचे तिकिटही पोलिसांनी जप्त केले आहेत. या भागात ती कशासाठी फिरली?, कोणाला भेटली याचाही पोलीस तपास करणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात नगर परिषदांच्या निवडणुका आहेत. दिल्लीत नुकताच बॉम्बस्फोट झालेला आहे. कल्पना ही त्या भागात फिरलेली असल्याने पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. याशिवाय, पाकिस्तानात राहणारा अहेमद यमा गालिब याच्यासोबतचे चॅटिंग तिने डिलीट केलेले आहे. त्यामुळे नॅशनल थ्रेटचा संशय बळावला आहे. सरकारी वकील जरिना दुर्राणी यांनी बाजू मांडली.
कल्पना भागवत आणि निखिल भाकरे या दोघांच्या नावाचा १९ कोटी रुपयांचा धनादेश तिच्या घरात सापडला आहे. चेतन सुंदरजी भानुशाली यांचा बँक ऑफ इंडियाचा हा चेक असून ७ मार्च २०२५ रोजी त्यांनी दिलेला असल्याचे सांगितले जाते. याशिवाय, कॉसमॉस बँकेचाही ६ लाखांचा तिच्या नावावरील चेक पोलिसांनी जप्त केला आहे. एवढ्या मोठ्या रकमांचे चेक तिला या लोकांनी कशासाठी दिले? याचाही पोलीस तपास करीत आहेत.कल्पना भागवत हिच्याकडे आढळलेली खाडाखोड केलेली २०१७ च्या आयएएस निकालाची यादी तिला मनोज लोढा आणि दत्तात्रय शेटे यांनी दिल्याचे ती सांगते. मात्र, लोढा आणि शेटे कोण? याचा अद्याप काहीही सुगावा मिळालेला नाही. पोलीस याबाबत त्यांच्याकडे विचारपूस करण्याची थाट शक्यता आहे.
संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरु डॉ. एस एन पठाण यांंचे एक लेटरहेड पोलिसांना तिच्या घरात सापडले आहे. त्यावर कल्पना भागवत हिला आयएएस संबोधले आहे. तसेच, ती सामाजिक आणि धार्मिक कार्य चांगल्या पद्धतीने करीत असल्याचा त्यावर उल्लेख आहे. या प्रमाणपत्राची सत्यता पोलीस तपासणार आहेत. तिला खरंच कुलगुरुंनी हे प्रमाणपत्र दिले का? याचा पोलीस शोध घेणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.