संजय जाधव, बुलडाणा
भाजपच्या 'एक्स' (ट्विटर) हँडलवरून देवेंद्र फडणवीस यांचा 'मी पुन्हा येईन'चा व्हिडिओ पोस्ट करण्यात आल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. त्यावरून संजय राऊतांनी शिंदेंवर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाच्या आमदारानं शिवसेना आणि भाजपसंदर्भात एक टिप्पणी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळं शिवसेना आणि भाजपला पुन्हा प्रतिष्ठा मिळाली, असं आमदार संजय गायकवाड म्हणाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भाजपच्या एक्स हँडलवरून देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईनचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. यावरून राजकीय वादळ उठल्यानं काही वेळानं ती पोस्ट हटवण्यात आली. तोपर्यंत राज्याचं राजकारण पुरतं ढवळून निघालं. संजय राऊत यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. मी पुन्हा येईन म्हणणारे आले तर, त्याचं स्वागतच आहे, असं राऊत म्हणाले. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री बेकायदेशीर आहेत. ते बेकायदेशीर आदेश देतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्या आरोपांना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सडेतोड उत्तर दिलं.
एकनाथ शिंदेंमुळे शिवसेना आणि भाजपला पुन्हा प्रतिष्ठा मिळाली. महाराष्ट्राला महायुतीचं सरकार मिळालं. सरकार कायदेशीर काम करत आहे. कायद्याच्या चौकटीत राहून काम करत आहे. संजय राऊत यांनी कोणती घटना वाचली? कोणत्या कायद्याच्या आधारे बोलतात? त्यांनी एखाद्या वकिलाकडे ट्युशन लावून ते समजून घ्यायला हवे, अशा शब्दांत गायकवाड यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. या दाव्यावर संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंवर महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. २०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिंदेंच्या नेतृत्वात लढल्या जातील, असं गायकवाड म्हणाले.
नरेंद्र मोदी हे शिंदे यांचे प्रत्येक भाषण ऐकतात. मोदी हे त्यांच्या भाषणात नेहमीच शिंदे साहेबांची पाठ थोपटतात. हे संजय राऊतांना त्यांच्या चष्म्यातून दिसत नाही. त्यांची वक्तव्ये म्हणजे ते शिंदेंवर जळतात, असेही गायकवाड म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांच्या त्या व्हिडिओवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही समजता तसा त्याचा अर्थ नाही. शिवसेना, भाजप आणि अजित पवार गट असे एकत्रित सरकार पुन्हा येईल असा त्याचा अर्थ होतो. त्याचा कोणताही गैरअर्थ काढू नये, असंही गायकवाड यांनी सांगितले. शरद पवार हे मोठे नेते असून, त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मराठा समाजबांधव आक्रमक झाला आहे. अनेक नेत्यांना गावोगावी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. संजय गायकवाड यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आरक्षण मिळावे यासाठी आम्हीही उडी मारली आहे. अगदी कमी वेळेत या सगळ्यातून एकनाथ शिंदे मार्ग काढतील. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वासही गायकवाड यांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.