ओंकार कदम, साम टीव्ही
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून पक्षप्रवेशांची मालिका सुरू असून आता भाजप नेते तथा ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना मोठा धक्का बसणार आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर गोरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. शेखर गोरे यांच्या या निर्णयामुळे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा राजकीय दणका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना विजयी करण्यासाठी शेखर गोरे यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाने माण-खटाव मतदारसंघात नव्या राजकीय समीकारणांची नांदी होण्याची शक्यता आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याने शेखर गोरे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. या नाराजीनंतर शेखर गोरेंनी आपली पुढील राजकीय दिशा निश्चित केल्याचे बोलले जात आहे. गोरेंनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याने भाजपच्या गोटात आणि विशेषतः माण-खटावच्या राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांच्या विजयासाठी मोलाची भूमिका बजावणारे शेखर गोरे आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने 2029 च्या निवडणुकीचे समीकरण बदलणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शेखर गोरेंच्या पक्षप्रवेशामुळे माण आणि खटाव तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्याची शक्यता असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. एकेकाळी विजयासाठी खांद्याला खांदा लावून उभे राहिलेले शेखर गोरेंनी वेगळी राजकीय वाट धरल्याने सातारा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.