राज्यभरात परतीच्या पावसाचा कहर, वाहतूक विस्कळीत.
रत्नागिरी, रायगड, मुंबई, पुणे, सातारा येथे ऑरेंज अलर्ट जारी.
अहिल्यानगर जिल्ह्यात शाळांना दोन दिवस सुट्टी.
नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांत पिकांचे मोठे नुकसान.
राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याचबरोबर पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यालाही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशातच सुरक्षिततेच्या कारणास्तव अहिल्यानगरमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
शनिवारपासून राज्यभरात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलं आहे. ग्रामीण भागातील पूल, बंधारे आणि रस्ते पाण्याखाली गेले असून, वाहतूक ठप्प झाली आहे. विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे. इथल्या अनेक तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवार आणि मंगळवार या दोन दिवस शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापनाला आदेश दिले आहेत की, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. पावसामुळे झालेल्या अपघातांच्या घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. काही ठिकाणी प्रशासनाने खबरदारी म्हणून आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्क केले आहे. नाशिक, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांत शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्येही शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला असून, अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रस्त्यांवरील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात परतीच्या पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि पावसाळी नाल्याजवळ, पूलांवरून किंवा पाण्याने भरलेल्या रस्त्यांवरून जाण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, हवामानातील बदल आणि समुद्रातील तापमानवाढ यामुळे राज्यातील परतीचा पाऊस तीव्र झाला आहे. अशा परिस्थितीत प्रशासन, पोलीस विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहेत. नागरिकांना सतत हवामान विभागाचे अलर्ट लक्षात घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय गरज असल्यास बाहेर पडा असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.