
राज्यात रस्ते अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. यामध्ये अनेकजण मृत्यूमुखी देखील पडले आहेत. अशातच आता धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका ट्रक चालकाचा मृत्यू झालाय. हाती आलेल्या माहितीनुसार, हा अपघात ब्रेक फेल झाल्यामुळे घडला. कंटनेरचा ब्रेक फेल झाला त्यानंतर त्याची ट्रकला धडक बसली. यामध्ये ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात हा भीषण अपघात झाला. महामार्गावर अचानक कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने कंटेनरने ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात 38 वर्षीय कंटेनर चालक महेंद्रसिंग शेखावत यांचा जागीच मृत्यू झाला. महेंद्रसिंग हे मूळचे राजस्थान येथील आहेत.
अपघात इतका भीषण होता की कंटेनरचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात कंटेनरमधील क्लिनर विनोदकुमार जाट ,राजस्थान, किरकोळ जखमी झाला असून त्याला तातडीने विसरवाडी येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत. यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, पण आता ती पूर्ववत झाली आहे.