भूषण अहिरे, साम टीव्ही
धुळे: शिंदखेडा तालुक्यातील दरखेडा येथे एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. चारचाकी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या समोरासमोर धडकेत दोन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात चिमठाणे गावाजवळ असलेल्या दरखेडा या ठिकाणी झाला. अपघात इतका भीषण होता की यात दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मृत पावलेले दोन्ही तरुण हे दुचाकीवर स्वार होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या चारही जणांना स्थानिकांच्या मदतीने तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून रस्त्यावरील वाढत्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आलिशान कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये पाच प्रवासी जखमी झाले. ही घटना कारंजा तालुक्यातील चॅनल क्रमांक १६७ वर घडली आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आज कारंजा तालुक्यातील चॅनल क्रमांक १६७ वर भीषण अपघात झाला. आलिशान कारचा पुढील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ती दुभाजकाला धडकून उलटली. हा अपघात नागपूर लेनला झाला असून या अपघातात पाच जण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जखमींवर तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.