ग्रामीण भागात रूग्णालयातील सुविधांच्या अभावामुळे रूग्णांचे प्रचंड हाल होतात. कित्येक पैसे खर्ची करून देखील सुविधांच्या अभावामुळे रूग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढतो आहे. तर काही जण कर्ज काढून नाईलाज म्हणून शहराची वाट धरतात. मात्र आता एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट या उपकंपनीच्या स्थापनेमुळे रूग्णांना स्थानिक भागात उपचार मिळणे शक्य होणार आहे.
महाकेअर अंतर्गत नागपूमध्ये नागपूर हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट या उपकंपनीच्या स्थापनेसाठी महाकेअर संचालक मंडळाची पहिली बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली.या निर्णयामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील कर्करूग्णांना स्थानिक पातळीवर अत्याधुनिक सुविधा आणि उपचार तातडीने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.याचबरोबर राज्यातून कर्करोगाचे निर्मुलन करण्यासाठी महाकेअर कंपनीच्या कॉर्पस निधीसाठी 100 कोटी रुपये महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून देण्यासही तत्वतः मान्यता देण्यात आली. तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधी उभारण्यास व स्वीकारणे, महाकेअरच्या कार्यालयासाठी जी.टी.रुग्णालय येथील इमारतीत जागा उपलब्ध करून देणे, कंपनीचे लेखापरीक्षक व कंपनी सचिवांची नियुक्ती करणे, सल्लागार नेमणे आदी विषयांनाही महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन कंपनी संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.मुख्यमंत्र्यांनी बैठकीत रूग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे सोईसुविधा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. या सहकार्यामुळे राज्यातील कर्करोग निर्मुलनासाठी चालना मिळणार आहे.
यावेळी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलबरोबर तांत्रिक सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. टाटा मेमोरियलचे मा.खत्री व महाकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.चंदनवाले यांनी या करारावर स्वाक्षरी केली.हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्ऱॉन प्रोजेक्टची उपकंपनी
नागपुरात स्थापन करण्याचे मुख्य कारण म्हणजे नागपूर केंद्रबिंदु असल्याने विदर्भातील रूग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.महाकेअरने जाहीर केलेल्या आराखड्यानुसार नागपूरसह, मुंबई, छत्रपती संभाजीनगर ,नांदेड, कोल्हापूर, चंद्रपुर, नाशिक आणि अमरावती येथे केंद्रे उभारली जाणार आहेत.
या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री मा. माधुरी मिसाळ, अपर मुख्य सचिव (वित्त) मा. ओ.पी. गुप्ता, सचिव मा. विकासचंद्र रस्तोगी, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव मा. निपुण विनायक, वैद्यकीय शिक्षण सचिव मा. धीरज कुमार, आरोग्य आयुक्त मा. संजय काटकर, वैद्यकीय शिक्षण आयुक्त मा. अनिल भंडारी, महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय चंदनवाले, मानद सल्लागार व सदस्य डॉ. कैलाश शर्मा, नवीन खत्री, उपसचिव तथा सदस्य मा. संदीप ढाकणे आदी उपस्थित होते.