Delimitation Bill : ‘शरद पवारांच्या सहकाऱ्यांनी माती खाल्ली’; संजय राऊत राष्ट्रवादीच्या खासदारांवर कडाडले, भाजपवरही निशाणा

Delimitation Bill Row: डिलिमिटेशन विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी दर्शवलेल्या पाठिंब्यावरून संजय राऊत आक्रमक झाले आहेत. 'शरद पवारांच्या सहकाऱ्यांनी माती खाल्ली,' अशी टीका करत त्यांनी भाजपवरही हॉर्स ट्रेडिंगचे गंभीर आरोप केले.
Delimitation Bill Row
Delimitation Bill Row
Published On: 

Sanjay Raut Delimitation Bill Row : केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) विधेयकाला शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दर्शवलेल्या पाठिंब्यावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. "शरद पवार सध्या रुग्णालयात असून कोणताही निर्णय घेण्याच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेत नाहीत. अशा वेळी त्यांची विचारधारा टिकवण्याची जबाबदारी सहकाऱ्यांची होती, पण त्यांनी माती खाल्ली," अशा शब्दांत राऊत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आणि खासदारांवर घणाघाती टीका केली. महाबळेश्वर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप, एकनाथ शिंदे आणि अमोल कोल्हे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.

तुमचे ८ खासदार महाविकास आघाडी म्हणून निवडून आले आहेत, त्यात शिवसेनेची ताकद आहे, भाजपची नाही. ८ पैकी ५ ठिकाणी भाजपचा पराभव केला आहे. आता एकतर्फी सरकारच्या बाजूने उभे राहणे हा महाराष्ट्राशी केलेला विश्वासघात असून, मोदी-शहांच्या बाजूने मतदान केल्यास एकही खासदार पुन्हा निवडून येणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला.

ज्यांनी शरद पवारांचा पक्ष आणि कुटुंब फोडले, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना तुरुंगात टाकले, त्यांच्याच चरणाशी जाणे म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवण्यासारखे आहे. यापुढे या नेत्यांनी फुले, शाहू, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊ नये किंवा कराडच्या संगमावर जाऊन पुष्पचक्र वाहू नये, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

राष्ट्रवादीच्या ८ पैकी ३ ते ४ खासदारांना या विधेयकासोबत जायचे नसल्याचा दावा करत राऊत यांनी खासदार अमोल कोल्हे यांना थेट आव्हान दिले. "शिरूर, कोल्हापूरसह बहुसंख्य मतदारसंघांत शिवसेनेचा प्रभाव आहे. आम्ही लढू त्या जागा सांगा, कसे जिंकून देता ते बघतोच," असे राऊत म्हणाले.

Delimitation Bill Row
Delimitation Bill : डिलिमिटेशनला पाठिंबा देणाऱ्यांना Rahul Gandhi यांचा थेट इशारा, LOP नेमकं काय म्हणाले?

हे विधेयक म्हणजे लोकशाही संपवण्याचे कारस्थान आहे. ५४३ ऐवजी ८६० खासदार आणून २०२९ च्या निवडणुकीसाठी भाजपला आपल्या मर्जीप्रमाणे मतदारसंघ तयार करायचे आहेत, असा आरोप राऊत यांनी केला. १०० दिवसांपूर्वी लोकसभेत हे विधेयक पराभूत झाले होते. आता ते मंजूर करण्यासाठी अमित शहा यांनी 'नॅशनल हॉर्स ट्रेडिंग स्टॉक एक्सचेंज' स्थापन केले असून, या बिलाला मतदान करणाऱ्या खासदारांना दीडशे-दीडशे कोटींचा भाव चालू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. "आमचेही ६ खासदार फोडले, पण आम्ही अमित शहांच्या पायाशी गेलो नाही. पक्ष फुटण्यापेक्षा देश आणि महाराष्ट्र महत्त्वाचा आहे," असेही त्यांनी ठणकावले.

Delimitation Bill Row
Delimitation Bill: मोठी बातमी! २२ खासदारांच्या पक्षाचा डिलिमिटेशनला पाठिंबा; संसदेतील राजकीय गणित बदलले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.