डिलिमिटेशन विधेयकाला रोखण्यासाठी काँग्रेसकडून इंडिया आघाडीला एकसंध ठेवण्याचं आव्हान उभं राहिलंय. डीएमके आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मनधरणीसाठी खुद्द काँग्रेस नेते मैदानात उतरलेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधींकडून शेवटचे प्रयत्न सुरू झालेत. विशेष म्हणजे, मोदी सरकारच्या डिलिमिटेशन विधेयकाला इंडिया आघाडीतील डीएमकेनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पाठिंबा देण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे राज्यात ठाकरेसेनेसह काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांच्या पक्षाला लक्ष्य केलं. विशेष म्हणजे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट शरद पवारांवर जहरी टीका केली होती.
राज्यातील काँग्रेस नेत्यांनी पवारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असली तरी मात्र, विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी इंडिया आघाडीला साजेशी अशीच भूमिका पत्रकार परिषदेत मांडली... डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला तरी पवारांचं इंडिया आघाडीतील स्थान कायम राहील, असं गांधी म्हणाले.
एव्हंढच नव्हे तर शेवटच्या क्षणी काँग्रेसकडून शरद पवारांच्या मनधरणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबईत येऊन विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्ल्किार्जुन खर्गे यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते शरद पवारांचं मन वळवणार आहेत. मात्र, याआधीच राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी चेन्नईत डीएमके प्रमुख एमके स्टॅलिन यांची भेट घेतलीये. या नेत्यांमध्ये डिलिमिटेशन विधेयकावरून खलबतं झालीयेत. विशेष म्हणजे, राहुल गांधींनी सकाळीच स्टॅलिन यांच्या भेटीबाबत पोस्ट केली.
इंडिया आघाडीचे वरिष्ठ नेते आणि मी स्टॅलिन यांना भेटण्यासाठी आणि त्यांना डिलिमिटेशनला विरोध करण्याची विनंती करण्यासाठी चेन्नईला जातोय. 850 जागांपर्यंतचा विस्तार भारतातील लोकशाही संपवून टाकेल. भाजप-आरएसएसला भारताचा संपूर्ण निवडणूक नकाशा त्यांच्या फायद्यासाठी नव्यानं आखण्यासाठी अमर्याद मोकळीक मिळेल. स्टॅलिन भाऊ तमिळविरोधी शक्तींविरोधात नेहमीच खंबीरपणे उभे राहिलेत. देशाच्या हितासाठी, तमिळनाडूच्या हितासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी आपल्याला हे विधेयक एकत्रितपणे पराभूत करावे लागेल.
तर दुसरीकडे, राहुल गांधींच्या पोस्टला डीएमके प्रमुख एमके स्टॅलिन यांनीही उत्तर दिलं...
तामिळनाडू आणि तमिळ जनतेचे हित सर्वोच्च मानूनच आपण नेहमी प्रत्येक निर्णय घेतला या मार्गावर आपण कोणतीही तडजोड करणार नाही. इतिहास आमचे मूल्यमापन 'एट्टप्पन' (विश्वासघातकी) म्हणून नाही, तर 'कट्टाबोम्मन' (स्वातंत्र्यसैनिक वीरपांडिया कट्टाबोम्मन) म्हणून करेल, असा मला पूर्ण विश्वास आहे. भाजपनं रणनीती आखत अधिवेशनआधीच डीएमके आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांच्या लोकसभेतील आसनव्यवस्थेत बदल केलाय. त्यामुळे शरद पवारांचं मन वळवण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळतंय. त्यामुळे डिलिमिटेशन विधेयकाच्या पाठिंब्याबाबत शरद पवार नेमका काय निर्णय घेणार?.... इंडीया आघाडीच्या प्रयत्नांना यश येणार का? इंडीया आघाडी एकसंघ राहणार का ?याकडे सर्वांनचं लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.