चंद्रपूर महापालिका निवडणुकीपूर्वी बोगस पट्टा वाटपाचा आरोप
महापालिकेच्या बनावट शिक्क्यांचा वापर झाल्याचे चौकशीत निष्पन्न
तक्रारीत आरोपीचे नाव वगळल्याने संशय आणि संताप
काँग्रेसकडून दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी
संजय तुमराम, चंद्रपूर
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना जमिनीचे स्थायी पट्टे देण्याच्या नावाखाली बोगस पट्टे देण्यात आल्याचा गंभीर आणि तेवढाच धक्कादायक प्रकार चंद्रपुरात समोर आलाय. हा सर्व प्रकार भाजपच्या माजी शहराध्यक्षाने केल्याचा थेट आरोप आणि तक्रार महापालिकेकडे करण्यात आली आहे. मतदानाला एक दिवस शिल्लक असताना चंद्रपुरातील राजकीय वातावरण यामुळे चांगलेच तापले आहे.
चंद्रपूर महापालिका निवडणुकीत प्रचारादरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोळा हजार पट्टे देणार असल्याचे जाहीर करून चंद्रपुरात काही ठिकाणी पट्ट्यांचे वितरण केले. त्यांनी प्रत्येक भाषणात स्वतःला पट्टेवाला मंत्री म्हणून संबोधले. गरीबांना पट्टे मिळणार याचा आनंद होता. तर या माध्यमातून मतांचे गणित जुळवण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र हा प्रयत्न करताना तिकीट वाटपात घोटाळा केल्याप्रकरणी पदावरून हटवण्यात आलेले, माजी शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी पट्टे वाटपातही लोकांची फसवणूक केल्याची तक्रार झाल्याने भाजप अडचणीत सापडली आहे.
मागील नोव्हेंबर महिन्यात पट्टे देण्यासंदर्भात महापालिकेने अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले होते. याच नोटीशीवर महापालिकेचा बनावट शिक्का मारून, त्याला लेमिनेट करून लाभार्थ्यांना वितरित करण्याचा प्रकार सुभाष कासनगोट्टूवार यांनी केल्याची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेने चौकशी केली असता शिक्का आणि पट्टा बोगस असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या गंभीर प्रकाराची तक्रार महापालिकेने पोलिसात केली. मात्र, हा प्रकार कुणी केला, याचा या तक्रारीत उल्लेख नाही. जेव्हा की तक्रारदाराने सुभाष कासनगोट्टूवार यांच्या नावानिशी आणि पुराव्यानिशी तक्रार केली होती. त्यामुळे पालिका सुभाष कासनगोट्टूवार यांना वाचवत आहे, असा आरोप करीत तक्रारदाराने आंदोलनाचा इशारा दिलाय.
निवडणुकीत मते मिळवण्यासाठी केलेला हा गंभीर प्रकार म्हणजे मोठा गुन्हा आहे. गरिबांची फसवणूक आहे. त्यामुळे सुभाष कासनगोट्टूवार यांच्यावर आणि जे कुणी यात सहभागी आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखला करून तातडीने कारवाई केली जावी, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आजवर विविध प्रलोभने देण्यात आली. मात्र फसवणूक करून मते मिळवण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच बघायला मिळत आहे. याचे पडसाद निवडणुकीत कसे उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.