जळगावच्या रायसोनी नगरमध्ये एकाच रात्रीत मंदिर व घरफोडीच्या चार घटना.
चड्डी घालून, तोंड झाकलेले चोरटे CCTV मध्ये स्पष्टपणे कैद.
चांदीच्या पादुका, मूर्ती, रोख रक्कम व पेन ड्राईव्ह चोरीस.
पोलिस तपास सुरू असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
जळगाव शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा मध्यरात्री हाहाकार घातला. रायसोनी नगर परिसरात एकाच रात्रीत चार ठिकाणी चोरीचे प्रकार घडले आहेत. विशेष म्हणजे, ही सर्व प्रकरणं परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली असून, चोरटे "चड्डी गँग"म्हणून ओळखले जात आहेत. तोंडावर मास्क किंवा रुमाल, अंगावर केवळ चड्डी घातलेले चार जण सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. त्यांचे वावरणे अतिशय थाटात असून, त्यांचा उद्देश आणि तयारी स्पष्टपणे जाणवत आहे.
चोरट्यांनी श्री गजानन महाराज मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून ७०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका, दीड फूट उंचीची गणपतीची धातूची मूर्ती आणि दानपेटीतील रोख रक्कम लंपास केली. विशेष म्हणजे, ही दानपेटी अनेक दिवसांपासून उघडलेली नव्हती, त्यामुळे किती रक्कम चोरीस गेली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. दुसऱ्या मंदिरातून देखील चांदीची सामग्री आणि रोख रक्कम चोरीस गेली आहे, तर तिसऱ्या मंदिरात त्यांच्या हाती काहीच न लागल्याने त्यांनी पेन ड्राईव्ह चोरून नेल्याचे निदर्शनास आले आहे.
या व्यतिरिक्त परिसरात एका घरफोडीचाही प्रयत्न झाला आहे. संबंधित कुटुंब बाहेर गावी गेलेले असल्याने चोरट्यांनी संधी साधून त्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या.या सर्व घटना मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास घडल्या असून, चोरटे अतिशय व्यवस्थितपणे वेळेचे नियोजन करून वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचल्याचे CCTV फुटेजवरून दिसते. विशेष म्हणजे, चोरटे कोणतेही मोठे शस्त्र न वापरता, सुतारकामातील हत्यारे वापरत असल्याचेही दिसत आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकारामुळे भीतीचे वातावरण असल्याचे सांगितले असून, पोलिसांनी तातडीने या गँगचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांनी परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित स्थानिक पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात धार्मिक स्थळांवर आणि रिकाम्या घरांवर असे खुलेआम हल्ले होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. या घटनांमुळे शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता 'चड्डी गँग' विरुद्ध कारवाई कधी आणि कशी होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.