- जितेश कोळी
Dapoli : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दापोली (Dapoli) नगरपंचायतीचे तत्कालीन लेखापाल दीपक सावंत यांच्याविरोधात शासकीय निधीचा अपहार केल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात काल रात्री करण्यात आली. या तक्रारीनूसार पाेलीसांनी (police) दीपक सावंत यांच्या विराेधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे दापोलीत खळबळ उडाली आहे. (Tajya Batmya)
दापोली नगरपंचायत निवडणुकीत सत्तांतर झाल्यावर सत्ताधाऱ्यांना दीपक सावंत यांच्याबद्दल संशय असल्याने सावंत यांच्याकडून लेखापाल पदाची जबाबदारी काढून घेण्यात आली. शासनाच्या केडरचे लेखापाल सिद्धेश खामकर याच्यांकडे लेखापाल पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर सावंत यांना त्यांच्या ताब्यात असलेले दफ्तर खामकर यांच्याकडे हस्तांतरित करण्यास सांगण्यात आले मात्र ते हस्तांतरित करण्यास सावंत यांनी अनेक दिवस लावले.
सप्टेंबर महिन्यात लेखापाल खामकर नगरपंचायतीच्या विविध विकास योजनांच्या बँक खात्यांची स्टेटमेंट तपासत असताना त्यांना काही रकमा श्री एंटरप्रयाझेस, मंगेश पवार, शंकर पवार या नावाने नगरपंचायतिच्या विविध खात्यात शासनाच्या अनुदानाव्यतिरिक्त १ कोटी ३० लाख २०८ इतकी रक्कम जमा झाल्याचे निदर्शनास आले. १४ सप्टेंबर रोजी खामकर यांनी हि बाब मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर खामकर यांनी श्री एंटरप्रयाझेस, मंगेश पवार, शंकर पवार यांच्या खात्यांची तपासणी केली असता त्यांनी नगरपंचायतीचे कोणतेही काम न करता त्यांना या रकमा अदा करण्यात आल्या असल्याचे समोर आले.
या रकमा १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत अदा करण्यात आल्या होत्या. त्या कालावधीत दीपक सावंत हे लेखापाल होते. त्यामुळे दीपक सावंत यांना या संदर्भात खुलासा करावा असे पत्र देण्यात आले. मात्र सावंत यांनी कोणताही खुलासा केला नाही.. सावंत हे १ जानेवारी २००३ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत लेखापाल म्हणून दापोली नगरपंचायतीत कार्यरत होते.
दीपक सावंत यांनी कोणताही खुलासा न केल्याने त्यांना १६ सप्टेंबर रोजी निलंबित करण्यात आले व या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली. या समितीने १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीतील आर्थिक लेखे तपासून अहवाल सादर केला. या तपासणीत नगरपंचायतीच्या १६ बँक खात्यांचे स्टेटमेंटची पडताळणी केली असता अनेक गंभीर बाबी समोर आल्या.
तपासणी कालावधीत विविध खात्यांची दोन कँश बुक तयार करून त्यात वेगवेगळे तपशील नोंदवून दीपक सावंत यांनी नगरपंचायतीची फसवणूक केली आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी अपहारित रकमांशी संबंधित व्हाउचर गहाळ करण्यात आली आहेत. मंगेश पवार, शंकर माने, हुडा एंटरप्रायझेस, राहुल राठोड, वरदा एंटरप्रायझेस, शामल जाधव, सुरजकुमार यांना अपहार करण्याच्या दृष्टीने गैरमार्गाने रकमा हस्तांतरित करण्यात आल्या आहेत.
मुख्याधिकारी यांची धनादेशावर सही झाल्यावर दीपक सावंत यांनी धनादेशावरील रकमामध्ये फेरबदल करून त्यात वाढ करुन ते बँकेत सादर केले आहेत. अपहार लपविण्यासाठी मंगेश पवार, शंकर माने, श्री एंटरप्रायझेस यांच्या खात्यातून वेगवेगळ्या रकमा नगरपंचायतिच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आल्या आहेत.
आर्थिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये नगरपंचायतीच्या विविध बँक खात्यामधून ५ कोटी ८१ लाख १० हजार ३०९ इतक्या रकमेचा अपहार करण्यात आला असून त्यापैकी १ कोटी ३० लाख ४९ हजार २०८ इतकी रक्कम पुन्हा खात्यात जमा करण्यात आली आहे. हि अपहाराची रक्कम केवळ एका आर्थिक वर्षातील असून असून उर्वरित आर्थिक वर्षांची तपासणी करणे बाकी असून त्यामुळे अपहाराची रक्कम वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नगरपंचायतिचे लेखापाल सिद्धेश खामकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात दीपक सावंत यांच्या विरोधात अपहाराची तक्रार दाखल केली असून, दापोली पोलिसांनी दीपक सावंत यांचे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकीरण काशीद करत आहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.