मुंबई : एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40 आमदारांना घेऊन बंड केल्याने शिवसेनेत दोन गट पडले आहेत. अशातच बहुमताचा आकडा घटल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. शिंदे 40 हून अधिक आमदारांसह गुवाहाटी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले आहेत. अशातच गुवाहाटी येथील हॉटेलची बिलं कोण भरतं आहे? आमदारांच्या घोडेबाजाराची किंमत 50 कोटी हे खरं आहे का? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. (NCP Latest Marathi News)
राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ते महेश तपासे यांनी ट्विट करत हा प्रश्न उपस्थित केला आहे. "बंडखोर आमदारांची सुरत, गुवाहाटी येथील हॉटेलची बिलं कोण भरत आहे?, स्पाईस जेट विमानाचं बिल कोणी भरलं? आमदार घोडेबाजाराची किंमत ५० कोटी हे खरे आहे का? हे पैसे कोणी दिले?", असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. आयकर विभाग किंवा ईडीनं छापे टाकल्यास काळा पैशाचा स्तोत्र उघडकीस येईल, असंही तपासे यांनी म्हटलं आहे.
बंडखोर आमदारांवर दिवसाला 8 लाखांचा खर्च?
शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे जवळपास 40 आमदार आसामच्या गुवाहाटी शहरातील रॅडिसन ब्ल्यू लक्झरी हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या लक्झरी हॉटेलमध्ये एकूण 70 खोल्यांचे बुकिंग 56 लाख रुपयांना करण्यात आले आहे, ज्यामध्ये कार्यक्रमासाठीची विस्तृत जागा, एक आऊटडोअर पूल, एक स्पा आणि पाच रेस्टॉरंट आहेत. यामध्ये अन्न आणि इतर सेवांसाठी दैनंदिन अंदाजे खर्च 8 लाख रुपये (सात दिवसांसाठी 56 लाख रुपये) असण्याचा अंदाज आहे. (Eknath Shinde Latest News)
बंडाळीशी आमचा संबंध नाही, भाजपचे स्पष्टीकरण
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनीही या बंडाळीसाठी भाजपच कारणीभूत असल्याचा आरोप केला होता. एकनाथ शिंदे सांगत असलेली महाशक्ती /राष्ट्रीय पक्ष भाजपच असल्याचे ते म्हणाले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीशी आमचा कोणताही संबध नाही, या बातम्या आम्ही माध्यमावरच बघत आहे. असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शुक्रवारी माध्यमांशी बोलताना दिले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.