Buldhana ACB trap latest news : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. बिबी पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश रामभाऊ नागरे यांना ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि पोलीस कोठडी (PCR) वाढवून न देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू बसथांब्यावर एसीबीने सापळा रचून ही यशस्वी कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या भाऊ आणि पुतण्याविरुद्ध बिबी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची पोलीस कोठडी (PCR) वाढवून न मिळण्यासाठी, तसेच गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश नागरे यांनी तक्रारदाराच्या नातेवाइकाकडे सुरुवातीला ६ ते ७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी यासंदर्भात थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), बुलढाणा यांच्याकडे तक्रार नोंदवली.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने २८ जुलै रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान आरोपी पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश नागरे याने तडजोडीअंती ५ हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर सोमवारी (२९ जुलै) एसीबीच्या पथकाने लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू बसथांबा परिसर येथे गुप्तपणे सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने सतीश नागरे यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
गुन्हा दाखल
आरोपी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा एसीबीच्या पथकाने पार पाडली. पोलीस दलातील जबाबदार कर्मचाऱ्यानेच लाच मागितल्याचे उघडकीस आल्यामुळे पोलीस वर्तुळात आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शासकीय कामासाठी कुणीही लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी त्वरित एसीबीशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.