नागपुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या मृत्यूनंतर १२ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप
हॉस्पिटल संचालकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली
शिंदे गटाच्या शिवसेनेच्या ७ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
डोंबिवलीच्या रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मारहाण केली. हे प्रकरण ताजे असतानाच आता नागपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरमधील एका नामंकित हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूनंतर हॉस्पिटल संचालकाकडे तब्बल १२ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या ७ पदाधिकाऱ्यांविरोधात नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे नागपूरच्या राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा येथील विठ्ठल साठे यांना ३० ऑगस्ट रोजी उपचारासाठी नागपुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णाला गंभीर स्वरूपाचा संसर्ग झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले होते. उपचार सुरू असतानाच ५ सप्टेंबर रोजी रुग्णाचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णाच्या मृत्यूवरून हॉस्पिटल प्रशासन आणि संबंधितांमध्ये वाद निर्माण झाला.
हॉस्पिटल संचालक डॉ. मुरली बालसुंदरम कसियामल यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही जण हॉस्पिटलमध्ये आले आणि रुग्णाचा मृतदेह घेऊन जाणे, पत्रकार परिषद घेऊन हॉस्पिटलची बदनामी करणे, हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यासाठी कारवाई करण्यास भाग पाडणे, तसेच डॉक्टरांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत होते. हे प्रकरण मिटवण्यासाठी १२ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यापैकी १० लाख रुपये स्वतःसाठी आणि २ लाख रुपये रुग्णाच्या नातेवाईकांसाठी मागितल्याचा आरोपही समोर आला आहे. या संदर्भात ऑडिओ रेकॉर्डिंगसह तक्रार करण्यात आल्याचे वृत्त आहे.
या प्रकरणी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या ७ पदाधिकाऱ्यांविरोधात नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्यात खंडणीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये युवासेनेचे जिल्हाप्रमुख शरद सरोदे, महिला आघाडीच्या प्रमुख मनीषा पापडकर, उपजिल्हाप्रमुख पंकज खिंची यांच्यासह मुल्ला सिंह गौर, प्रतीक बहुगुणा, महेश ढोले आणि शुभम साठे यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आरोपींवरील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.