

अभिजीत सोनवणे, नाशिक | साम टीव्ही
राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो, तसा मित्रही नसतो असं आता महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं म्हणावं लागणार आहे. महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच, नाशिकमधील राजकारण अनपेक्षितरित्या बदललं आहे. महापालिकेच्या निवडणुकीत महायुती होईल असं वाटत असतानाच भाजपनं स्वबळाचा नारा दिला आहे, असं समजतं. तर महायुतीतीलच मित्रपक्ष अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्रित लढणार आहेत. दुसरीकडं महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब झालं असून, त्यात राज ठाकरेंच्या मनसेची भर पडली आहे. त्यामुळं नाशिक महापालिकेची निवडणूक आता तिरंगी होणार आहे.
नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार आहेत. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सर्वात मजबूत पक्ष मानला जाणारा भाजप स्वबळावर लढणार असल्याचे समजतंय. दुसरीकडे महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि मनसे अशी महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व घटकपक्ष एकजुटीने निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व पक्ष एकवटले असल्याचे बोलले जात आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जागा वाढवून देण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीत हे प्रमुख पक्ष एकत्र येण्यामागे ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांची भूमिका महत्वाची ठरली आहे. या दोन्ही पक्षांनी जागावाटपात औदार्य दाखवल्यानं ही एकी झाल्याचे बोलले जात आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रभारी सुनील भुसारा यांनी सांगितले की, महाविकास आघाडीच्या चर्चेच्या दोन-तीन फेऱ्या झाल्या. काही जागांबाबत संध्याकाळपर्यंत निर्णय होईल. शरद पवार राष्ट्रवादी, ठाकरे सेना, मनसे, काँग्रेस हे एकत्र लढणार आहेत. आठ-दहा जागांबाबत निर्णय होईल. ठाकरेंची सेना सर्वाधिक जागा लढणार आहे. तर मनसेला सोबत घेऊन आम्ही निवडणुका लढवणार आहोत. ठाकरे सेनेच्या कोट्यातून मनसेला जागा देणार आहोत.
एकत्र लढायचं असं आम्ही फायनल केलं आहे. आम्ही २०-२५ जागा लढत आहोत. उर्वरित जागा ठाकरे सेनेकडून मनसेला दिल्या जाणार आहेत. वंचितबाबत चर्चा सुरू आहे. नाशिकमध्ये मनसेला सोबत घेताना काँग्रेसने स्थानिक पातळीवर अधिकार दिले आहेत, असेही भुसारा यांनी सांगितले.
काँग्रेसच्या खासदार शोभा बच्छाव म्हणाल्या की, 'काँग्रेस आणि मनसेची चर्चा नाही. शिवसेना आणि मनसे यांच्यात चर्चा झाली आहे. एमआयएमसोबत जायचं नाही असे प्रदेश पातळीवर निश्चित झाले आहे. तर भाजपला विरोध करण्यासाठी मनसेला सोबत घ्यावे, असे स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना वाटले. मनसेची हिंदुत्वाची भूमिका असली तरी, आमचा सर्वधर्म समभावचा नारा आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.