

साम टीव्ही टीम
महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष अनेक ठिकाणी वेगवेगळे लढले. पण महापालिका निवडणुकीत एकत्रित लढतील आणि महायुती-महाविकास आघाडी अशी थेट लढत बघायला मिळेल असे चित्र सुरुवातीला होते. राज्यात वरिष्ठ पातळीवरील नेतेमंडळी युती किंवा आघाडीच्या चर्चेसोबतच जागावाटपाचा तिढा सोडवण्यात गुंतले आहेत. दुसरीकडं गल्लीत म्हणजे स्थानिक पातळीवर नुसता गोंधळ सुरू असल्याचं दिसतंय. अनेक ठिकाणी 'सूर' जुळले असले तरी, ते वरवरचेच वाटत आहेत. तर काही ठिकाणी अद्याप बैठका, चर्चा, नाराजी आणि नाराजीनामे सुरू झाले आहेत.
विकास मिरगणे, नवी मुंबई
मुंबईला लागूनच असलेल्या नवी मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात युतीबाबत अद्याप चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी अर्ज भरायला सुरुवात झाली असली तरी, नवी मुंबईत युतीबाबतच अद्याप ठरलेले नाही. भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. शिवसेना-भाजपमध्ये अद्याप युतीबाबत चर्चा सुरू आहे. १११ जागा आहेत. त्यापैकी शिवसेनेला २० जागा सोडण्याचा भाजपचा प्रस्ताव आहे. शिवसेनेकडून त्यावर अधिक चर्चेची अपेक्षा आहे. संध्याकाळपर्यंत शिवसेनेकडून उत्तराची अपेक्षा आहे. भाजपच्या संभाव्य उमेदवारांना उद्या एबी फॉर्म देण्यात येणार आहे. युती न झाल्यास भाजपची स्वबळाची तयारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सर्व माजी नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
अभिजीत सोनवणे, नाशिक
नाशिकसारख्या महत्वाच्या महापालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढण्याची घोषणा झालेली आहे. ठाकरे बंधूंची युती ही भाजप आणि शिवसेना यांच्यासाठी एकप्रकारे आव्हान आहे. पण भाजप-शिवसेना युतीचा तिढा अद्याप कायम आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील संभाव्य उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केल्यानंतर आता भाजपकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. सिडको विभागातून प्रभाग क्रमांक २९ मधून भाजपचे मुकेश शहाणे, माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या पत्नी योगिता हिरे या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वारकऱ्यांना सोबत घेऊन टाळमृदुंग आणि विठूनामाचा जयघोष आणि रामनामाचा गजर करत उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत.
अजय सोनवणे, मालेगाव
नाशिकला लागूनच असलेल्या मालेगावमध्येही युतीमध्ये विरोधाचा सूर निघत आहे. भाजपमधूनच शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करण्यास उघडपणे विरोध होत आहे. मंत्री दादा भुसे यांच्या विधानसभा उमेदवारीला विरोध करणारे बंडू काका बच्छाव यांनीच याबाबत मोठा खुलासा केला आहे. नुकताच पक्षप्रवेश केलेल्या बंडू काका बच्छाव यांनीच युतीला ठाम विरोध दर्शविल्याने मालेगावच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपचे माजी गटनेते सुनील गायकवाड आणि अद्वय हिरे यांचाही युतीला विरोध असल्याचे सांगण्यात येत आहे. मालेगावात भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, हा एकसंघतेला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. ऐन निवडणुकीतच युतीच्या मुद्द्यावर भाजपसमोर मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे.
अक्षय शिंदे, जालना
जालना महानगरपालिकेतील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सलग सहा बैठका झाल्यात, पण एकमत होऊ शकलेलं नाही. त्यामुळं जागावाटपाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात आलाय. आज सायंकाळपर्यंत यावर निर्णय होण्याची शक्यता असून, त्याआधी आज पुन्हा महायुतीची बैठक होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ६५ जागांपैकी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांना प्रत्येकी २९ जागा देण्याचा फॉर्म्युला आहे, तर उर्वरित ७ जागा अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय आठवले गटासाठी राखीव ठेवण्यात आल्याचं बोललं जात आहे. आता या जागावाटपावर राज्यस्तरावर अंतिम निर्णय काय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.