

भाजप खासदारांच्या धावत्या कारला अचानक भीषण आग लागली
नाशिकजवळ मुंबई–नाशिक महामार्गावर ही घटना घडली
चालकाच्या सतर्कतेमुळे खासदारासह सर्व प्रवाशांचे प्राण वाचले
रेंज रोव्हर कार पूर्णपणे जळून खाक झाली
मुंबई-नाशिक महामार्गावर भाजप खासदाराच्या कारला भयंकर अपघात झाला. भाजप खासदाराच्या धावत्या कारने अचानक पेट घेतला. ते आपल्या सहकाऱ्यांसोबत त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी निघाले होते. वाटेतच त्यांच्या कारने पेट घेतला. या अपघातामध्ये त्यांची कार जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्वांचे प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री नाशिक- मुंबई महामार्गावर ही घटना घडली. राजस्थानच्या जालोर-सिरोही मतदारसंघाचे भाजप खासदार लुंबा रामजी चौधरी हे महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दौरा संपल्यानंतर ते महाशिवरात्रीनिमित्त नाशिक येथील त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत काही सहकारी देखील होते. त्र्यंबकेश्वरला जाताना वाटेत मुंबई- नाशिक महामार्गावर त्यांच्या धावत्या कारने पेट घेतला.
शहापूर येथे राहणारे अनिल बबन जाधव (४० वर्षे) हे कार चालवत होते. नाशिकच्या गोंदे फाटा येथे पोहचले असता कारमध्ये जळाल्यासारखा वास येत होता. इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालक अनिल यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ कार महामार्गाच्या कडेला उभी केली आणि सर्वांना कारमधून खाली उतरण्यास सांगितले. क्षणाचा विलंब न करता सर्वजण तातडीने कारमधून उतरले त्यामुळे सर्वांचे प्राण वाचले.
बघता बघता कारने पेट घेतला आणि काही वेळात संपूर्ण कार जळून खाक झाली. या आगीमध्ये कारचा अक्षरश: कोळसा झाला. या कारचे फोटो देखील समोर आले आहेत. कारला आग लागल्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या आगीमध्ये ४ कोटींची रेंज रोव्हर कारचा अक्षरश: कोळसा झाला. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत संपूर्ण काळ जळून खाक झाली होती. शॉर्ट सर्किटमुळे कारला आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिस तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.