लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुतीचे नेते खडबडून जागे झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्यांनी आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. मात्र, जागावाटपावरून महायुतीत वादाचे फटाके फुटत असल्याचं समोर आलंय.
शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाशिक दौरा केला. यावेळी त्यांनी निफाड तसेच कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचा आढावा देखील घेतला. महायुतीतील जागावाटपात हे दोन्ही मतदारसंघ आपल्या वाटेला येतील. त्यामुळे आतापासूनच निवडणुकीसाठी जोरदार तयारी करा, असं अजित पवार यांनी कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना सांगितलं.
यावरून भाजपचे (BJP Nashik) स्थानिक पदाधिकारी नाराज झाले आहेत. विधानसभेत हे दोन्ही मतदारसंघ आपल्यालाच मिळायला हवे, अशी मागणी भाजपच्या स्थानिक नेते तसेच पदाधिकाऱ्यांनी केली आहे. इतकंच नाही, तर अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर निफाड मतदारसंघात भाजपने ठराव देखील घेतला आहे.
निफाड मतदारसंघाची जागा भाजपाला मिळावी, यासाठी हा ठराव करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात एकमताने ठराव मंजूर करण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीत अजितदादा गटाने या मतदारसंघातून आपल्याला मदत केली नाही, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे विधासभेच्या जागावाटपाआधीच महायुतीत वादाचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, निफाड हा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे. याठिकाणी अजित पवार गटाचे दिलीप बनकर विद्यमान आमदार आहेत. विशेष बाब म्हणजे, शुक्रवारीच अजित पवार यांनी दिलीप बनकर यांच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर दिवसभर अजित पवार कळवण-सुरगाणा मतदार संघाचा दौरा केला होता. त्यांच्या या दौऱ्यानंतर भाजपचे स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.