अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी
BJP ticket distribution controversy Maharashtra : राज्यात भाजपाचं तिकीट वाटप चांगलं चर्चेत राहिलंय. अनेक ठिकाणी तिकीट वाटपावरून झालेला मोठा गोंधळ, रडारड आणि त्यावरून झालेला राडा राज्यात चर्चेचा विषय बनलाय. अनेक ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डावलून इतर पक्षातून आलेले उपरे आणि मोठ्या नेत्यांच्या कुटूंबात दिलेल्या तिकिटावरूनही भाजपवर मोठी टीका झाली. मात्र, अकोल्यात भाजपाने दिलेल्या एका तिकिटाची जोरदार चर्चा शहरात होतेय. अकोल्यात भाजपने प्रभाग क्रमांक 20 मधून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवर 'मंगेश झिने' या अत्यंत सर्वसामान्य घरातील गरीब तरुणाला उमेदवारी दिलीये.
मंगेश हा गेल्या दहा वर्षांपासून खडकी भागात महावितरण (वीज) बिल वाटपाचं काम करतोय. तर त्याची आई लोकांच्या घरी धुणीभांडी करतेय. यासोबतच त्याचे वडील हे चौकीदारी करतात. अकोल्याच्या खडकी भागात एका खोलीच्या भाड्याच्या घरात राहत असलेलं हे गरीब कुटुंब रातोरात संपूर्ण शहरात चर्चेत आलंय.
भाजपने अकोला महापालिकेतील भाजपचा चर्चित चेहरा असलेल्या आणि चार वेळा नगरसेवक असलेल्या विजय इंगळे यांचं तिकीट कापत मंगेश झिने यांना तिकीट दिलंये. मंगेशकडे प्रचार करायलाही पैसे नसल्याने त्याच्यासोबतचे इतर उमेदवार आणि कार्यकर्ते वर्गणी करून त्याचा प्रचार करतायेत. मंगेश आणि त्याच कुटुंबीय उमेदवारी मिळाल्याने आनंदित आहे. दरम्यान, मंगेश झिने हा अनेक वर्षापासून खडकी परिसरात इलेक्ट्रिक बिलचं घरोघरी जात वाटप करतोय. त्यातून प्रत्येकी बिलमागे 1 रुपया त्याला मिळतो. तर आई घरोघरी धुणीभांडी करते त्यांनाही 4 ते 5 हजार रुपये दरमहा, तर वडील रात्रीचे चौकीदारी करतात.. अशाप्रकारे मंगेश यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतोय. मंगेश लग्न झालेला असून 2 मुलं आहेत. आज तो भाड्याच्या घरात राहतो आहे.. त्याच्याकडे साधी दुचाकी सुद्धा नाहीये, अजूनही मंगेश सायकलनेचं फिरतोये.
4 वेळा नगरसेवक राहिलेल्या नगरसेवकाच तिकीट कापलं, अन मंगेशवर विश्वास..
अकोला महापालिकेच्या राजकारणातील भाजपमधलं मोठंं नाव असलेल्या विजय इंगळे यांचं तिकीट भाजपने कापलंय. प्रभाग क्रमांक 20 मधून त्यांच्या ऐवजी पक्षाने नवख्या मंगेश झिने या व्यक्तीला उमेदवारी दिलीये. त्यामुळे नाराज झालेल्या विजय इंगळे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करत उमेदवारी दाखल केलीये. विजय इंगळे आणि कुटुंबीय महापालिकेच्या स्थापनेपासून महापालिकेत नगरसेवक म्हणून सातत्याने विजयी होत आहेत. स्वतः विजय इंगळे, त्यांच्या आई आणि पत्नी या महापालिकेत भाजपच्या नगरसेवक राहिल्यायेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.