छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीमध्ये चांगलीच जुंपली असून विधानपरिषदेची ही जगा भाजपला सुटल्याने शिंदेसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपने या जागेसाठी सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली असून महायुतीचे ते अधिकृत उमेदवार आहेत. तीनही पक्षाने मिळून काम करणे अपेक्षित असताना शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट बंड करणार असल्याचा इशारा दिला आहे. अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगर-जालना या मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर सत्तार यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. आमचा एक एक गड संपत चालला आहे. भाजपकडून शिवसेनेला संपवण्याचे काम केले जाते आहे असा सनसनाटी आरोप सत्तार यांनी केला आहे.
मुलगा समीर सत्तार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सत्तार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पहिले आमची ग्रामपंचायत घेतली, जिल्हा परिषद घेतली नंतर महापालिका देखील घेतली. स्थानिक पातळीवर आमच्याविरोधात राजकारण सुरू आहे. ही खदखद वेगळे रूप घेऊ शकते. संभाजीनगर आमचा पारंपरिक गड होता, अशा भावना यावेळी सत्तार यांनी व्यक्त केल्या.
तसेच आमच्या नेत्याला याबाबत माहिती मिळाली नाही तर बंगालमध्ये जे घडले तेच महाराष्ट्रात घडेल. पहिले ममता बॅनर्जी आणि भाजपची युती होती. जे पश्चिम बंगालमध्ये झाले ते महाराष्ट्रात होता काम नये, आमच्या नेत्याला आम्ही सर्व तंतोतंत माहिती देऊ, असे यावेळी सत्तार यांनी सांगितले.
आम्ही आमच्या नेत्याला सोडून इथे आलो, भाजप या जुन्या मित्रासोबत आलो. पण पुन्हा तिच परिस्थिती येतेय. हे स्लो पॉयझन आहे. आमचा एक एक गड संपत चालला असून आम्ही सत्तेत असून आम्हाला बाहेर जाण्याचा मार्ग दाखवला जातोय. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सत्तार यांनी अत्यंत आक्रमक भाषेत भाजपवर प्रहार केला. शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम आपलाच मित्रपक्षच करत आहे. आमचा त्याग गुवाहाटीतील कामाख्या देवीला माहिती आहे, भाजप तो त्याग आता पूर्णपणे विसरली आहे. भाजप आमच्या पक्षात गटतट पाडत आहे, त्यांनी आमचे हातपाय आधीच तोडले होते, आत थेट मुंडकंच तोडून टाकले असा संताप त्यांनी व्यक्त केला
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.