बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात उमेश मानेविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
विवाहित महिलेने जबरदस्ती, धमक्या आणि ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोप केले
२० जून रोजी झालेल्या वादानंतर विलास घुले यांच्यावर हल्ला होऊन मृत्यू
केज पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्यात आली असून पिंक पथकाकडून तपास सुरू
बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या उमेश मानेविरोधात अखेर केज पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी पूर्ण करून गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान आता या प्रकरणाला कोणते नवे वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मृत विलास घुलेचा मित्र उमेश माने याचे एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते. संबंधित महिलेवर उमेश वारंवार बळजबरी करत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडायचा. अत्याचारानंतर ही घटना कोणालाही सांगितल्यास तिच्या मुलांना जीवे मारण्याची तसेच तिच्या पतीसमोर अनैतिक संबंध असल्याचे खोटे सांगण्याची धमकी द्यायचा. या भीतीमुळे पीडिता काही काळ गप्प राहिली होती. मात्र, उमेशने ३ जून रोजी पुन्हा ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केले. विलास घुलेने देखील या महिलेला उमेशसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी धमकी दिली.
दरम्यान २० जूनच्या रात्री उमेश विलासच्या हॉटेलवर गेला होता. तिथेच पीडित महिलेच्या कुटुंबातील ८ ते ९ जण तिथे पोहोचले. आमच्या मुलीला का त्रास देतो असा प्रश्न विचारला आणि दोन्ही बाजूने वाद सुरु झाला. ८ ते ९ जणांच्या घोळक्याने उमेशला मारहाण करायला सुरुवात केली. हे भांडण मिटवण्यासाठी विलासने मध्यस्थी केली. यादरम्यान पीडित महिलेच्या वडिलांनी विलासवर हल्ला केला. या हल्ल्यात विलासची हत्या झाली.
एकीकडे विलास घुलेच्या कुटुंबीयांनी हा नियोजित कट रचून हत्या केल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे पीडित महिलेने आता विलास घुलेच्या मित्रावर बलात्काराचे आरोप केले आहेत. याप्रकरणी महिलेने केज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून उमेश माने विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात आता कोणतं नवं वळण येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सध्या या प्रकरणाचा तपास केज पोलीस उपविभागीय कार्यालयाच्या पिंक पथकाकडून करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.