'सगळं करायचं असेल तर सरकार हातात पाहिजे आणि आम्ही ठरवले हे सरकार हातात घ्यायचं.', असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे. शरद पवार यांनी आज बारामती तालुक्यातील सुपा गावामध्ये दुष्काळ पाहणी दौरा केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे.
शरद पवार यांनी सांगितले की, 'देशाच्या दृष्टीने महत्त्वाची निवडणूक होती. आम्ही आघाडी म्हणून लढलो. राज्यात ४८ जागांपैकी ३० जागा जिंकल्या. एनसीपीने मुद्दाम कमी जागा लढण्याचा निर्णय घेतला. १० जागा घेतल्या ८ जिंकल्या. त्यात तुमचा वाटा होता. बारामती निवडणूक देशात गाजली. निवडणूक काळात सगळे लोकं काम करत होते. पण काही गावातील लोकं दडपण असल्यासारखे वागत होते ते पुढे येत नव्हते. काही लोकं सुरुवातीला सोबत आले आणि परत गायब झाले. या निवडणूकीत अनेक जण दिसले नाहीय. लोक मनात असेल ते करतात दाखवत नाहीत. शांतपणे तुम्ही बटण दाबलं. बारामती तालुक्याने सर्वात जास्त मतदान दिलं. त्यामुळे तुमचं आभार.'
शरद पवारांनी पुढे सांगितले की, 'आज पाण्याबाबत जास्तीत जास्त निवेदन आहे. जनाई शिरसई योजना केली, तलाव केले. काहीना फायदा मिळाला काहिंना मिळाला नाही. जी कामं झाली नाहीत ती पूर्तता करण्याची मागणी आहे. पूर्तता करण्याची काळजी घ्यावी लागेल. यानंतर निवडणुका सपल्या आहेत. मी अनेक गावं फिरलो. मला काळजी वाटतेय की आता लोकं म्हणतात पाईप लाईनने पाणी द्यावं. पण या आता मागण्या परस्पर वेगळ्या आहेत. माझ्या मते पाटाने पाणी दिलं गेलं पाहिजे. त्याचे फायदे आहेत.'
तसंच, 'दूध दरवाढ करून घ्यावी लागेल. कांद्यावर निर्यात कर बसवला त्यामुळे कांदा खरेदी थांबली. इतर राज्यातील कांद्यावर कर नाही. मग आम्हीच काय घोडे मारले माहिती नाही. इथला कांदा बाहेर गेला पाहिजे. सगळं करायचे असेल तर सरकार हातात पाहिजे आणि आम्ही ठरवले हे सरकार हातात घ्यायचे. दूध दरवाढ, कांदा निर्यात आणि इतर सगळं करायचे आहे. चार महिन्यांनी निवडणुका आहेत. बाकी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाका.', असे आवाहन शरद पवारांनी केले आहे.
यासोबतच, 'हे हिरवं शेत दिसत आहे हे तात्पुरते आहे. पाऊस पडला आहे चांगली गोष्ट आहे. हे हिरवं करायचं असेल तर इथे पाणी दिले पाहिजे. माझा प्रयत्न उद्या मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची भेट घ्यायची. आग्रह करायचा काही गोष्टी झाल्या तर ठीक. नाही झाल्या तर ज्या राहतील त्या गोष्टी चार महिन्यांनी करू. चार महिने कसे करू हे आता सांगणार नाही.', असे देखील शरद पवारांनी यावेळी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.