
विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाची कबर हटवा अशी मोहीम सुरू केल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण पोलिसांनी खुलताबाद येथे पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर हटवा अशी मागणी केल्यानंतर त्या मोहिमेला आज सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे आजही खुलताबाद येथील परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिलिंद एकबोटे यांना छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा प्रशासनाने आणि पोलिस प्रशासनाने ५ एप्रिलपर्यंत जिल्हा बंदी करण्यात आलेली आहे. कबरीच्या परिसरात असलेल्या दर्गा परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सोबतच लोखंडी बॅरिगेटिंग टाकण्यात आले आहेत. खुलताबाद आणि औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.
औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अहिल्यानगर शहराजवळील आलमगीर येथे १७०७ साली औरंगजेबाचा मृत्यू झाला होता आणि या ठिकाणाहून औरंगजेबाचा मृतदेह दफनविधीसाठी संभाजीनगर या ठिकाणी नेण्यात आला होता. सध्या संभाजीनगरमधील औरंगाजेबच्या या कबरीवरून महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने कबर आणि चबुतरा हटविण्याची मागणी केली आहे. आज शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होणार असून सरकार आणि स्थानिक प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून मोठ्या प्रमाणात वाद पेटला आहे. 'औरंगजेबाची कबर काढून टाकावी अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू.', असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने दिला होता. याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात आंदोलन सुरू आहेत. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान हिंदुत्ववादी कार्यकर्ते प्रतिकात्मक औरंगजेबाची कबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, 'सरकारला आजच औरंगजेबाची कबर दिसली का? तुम्हाला समाजात समाजामध्ये भांडण लावून तुमची पोळी भाजायची का?' असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी उपस्थित केला आहे. 'शासनाने असं कोणतेही काम करू नये जिथे घरोघरी चुलीऐवजी घर पेटतील.', असे आवाहन संजय जाधव यांनी केले आहे.
तर, भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील औरंगजेबाच्या कबरीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'आमच्या महाराष्ट्रामध्ये जी औरंग्याची कबर आहे ती आठवण आम्हाला नको आहे ही हिंदू समाजाची भावना आहे. ज्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराज यांना हाल करून संपविले त्याची कबर कशाला पाहिजे. काहिंना ती आठवण वाटते मात्र ती घाण आम्हाला नको आहे. अशी कोणतीच चिन्हे नको जी आमच्या स्वराज्याच्या विरोधात उभे राहिले ती घाण नको आहे. ज्यांना आठवण वाटते त्यांनी पाकिस्तानमध्ये घेऊन जावं.', असे नितेश राणे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.