
अक्षय शिंदे पाटील, साम टीव्ही
ठाकरे बंधूनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. रामदास आठवले यांच्या वक्तव्यावर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी मोठं भाष्य केलं आहे. 'रामदास आठवले काही आंबेडकर कुटुंबातील नाही. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र येऊ शकतो. राजकराणात सर्व प्रकारच्या शक्यता असतात, असं वक्तव्य आनंदराज आंबेडकर यांनी केलं आहे. आंबेडकरांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
आनंदराज आंबेडकर जालना दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आनंदराज आंबेडकर यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी रामदास आठवले यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. आनंदराज आंबेडकर म्हणाले, 'पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंब एकत्र येत आहे. रामदास आठवले काही आंबेडकर कुटुंबातील नाही. त्यामुळे त्यांचाबरोबर एकत्र येण्याचा प्रश्नच येत नाही. माझं म्हणणं हे की, गोठ्यामध्ये गाई म्हशी बांधल्या जातात, गाढव नाही'.
आंबेडकर बंधू एकत्र येऊ शकतात,असा दावाही आनंदराज यांनी केला. 'आम्ही बंधू एकत्र येऊ शकतो. राजकारणात सर्व प्रकारची शक्यता असते. आपण पाहिलं असेल की, पवार एकत्र येतील असं वाटलं नव्हतं. ठाकरे कधी एकत्र येतील असं वाटलं नव्हतं. पण आज चर्चा चालू आहे. त्यामुळे राजकारणामध्ये काहीच अशक्य नाही आहे,असे आनंदराज आंबेडकर म्हणाले.
सिंदूर ऑपरेशनवर भाष्य करताना आनंदराज आंबेडकर म्हणाले, 'पाकिस्तान गुडघ्यावर असताना युद्ध थांबवणे अत्यंत दुर्दैवी निर्णय होता. ट्रम्प सरकारचं केंद्रावर दबाव होता का, हे काही कळत नाही. आपल्या देशाला पन्नास वर्षांपासून सतत दहशतवादाचा हल्ले होत आहेत. निरपराध नागरिकांची हत्या होत आहे. आमच्या माता भगिनींचा सिंदूर पुसल्या जात आहे. आता अत्यंत योग्य वेळ आली होती. आजची पाकिस्तानची परिस्थिती अनिश्चित आहे.. पण अचानक युद्धबंदी करणे हे न कळलेलं कोड आहे. या देशातील प्रत्येक नागरिकाला हे न कळलेलं कोड आहे. सरकारने याबाबतीत परत योग्य तो निर्णय घ्यावा आणि एकदाच सोक्षमोक्ष लावावा'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.