Amit Deshmukh's Tipu Sultan Remark : भावी पिढीला टिपू सुलतान कळायला हवेत, असे विधान काँग्रेसचे लातूरमधील आमदार अमित देशमुख यांनी केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलेय. काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यावर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेत तीव्र संताप व्यक्त केला आहे. जर कोणी टिपू सुलतानचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराच नितेश राणे यांनी दिला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
अमित देशमुख नेमकं काय म्हणाले?
टीपू सुलतान यांचे कार्य आणि विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावेत. तरुणांमध्ये विचार रुजविण्यासाठी आवश्यक पुस्तके उपलब्ध करून देण्यास मदत करणार असल्याचे आमदार अमित देशमुख म्हणाले. टीपू सुलतान यांचे विचार लातूरमधील तरुणांमध्ये रुजविण्यासाठी आवश्यक पुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन काँग्रेस नेते तथा आमदार अमित देशमुख यांनी केले आहे. यासाठी आपण निश्चितपणे मदत करू, असेही त्यांनी म्हटले आहे.
लातूरमध्ये टीपू सुलतान सार्वजनिक जयंती समारोह समितीच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार अमित देशमुख यांनी उपस्थिती लावली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे आवाहन केले आहे.
नितीश राणे काय म्हणाले?
आगामी पिढीला टिपू सुलतान यांचा इतिहास कळायला हवा आणि त्यासाठी पुस्तके प्रकाशित केली पाहिजेत, असे विधान काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावरून राज्यातील राजकारण तापले असून, भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
टिपू सुलतानचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देत नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. टिपू सुलतानचा इतिहास आणि त्याच्या भूमिकेवरून अमित देशमुख यांनी मांडलेल्या मताला राणे यांनी थेट आव्हान दिल्याने, या विषयावरून आता भाजप आणि काँग्रेसमध्ये नवा संघर्ष सुरू झाल्याचे चित्र आहे. टिपू सुलतानचे समर्थन करणाऱ्यांना आणि उदात्तीकरण करणाऱ्यांना सहन केले जाणार नाही, असा थेट इशारा त्यांनी यावेळी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमित देशमुख यांच्यावर जोरदार टीका -
लातूरमध्ये दुष्काळाचे सावट आणि पाण्याचे संकट असताना टिपू सुलतान यांच्या कार्यक्रमात नोटांची उधळपट्टी झाल्याचा आरोप करत नवनाथ बन यांनी काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आगामी पिढीला टिपू सुलतानचा इतिहास शिकवण्याची भाषा करणाऱ्या अमित देशमुखांनी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात टिपू सुलतानचा गौरव का केला जातो, असा सवाल उपस्थित करत नवनाथ बन यांनी काँग्रेसवर एमआयएमच्या सुरात सूर मिसळल्याचा आरोप केला तसेच अमित देशमुख यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.