अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कोपरगाव शहरात राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. स्वामी समर्थ मंदिर परिसरातील एका विकासकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून भाजप आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस या दोन्ही सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याची धक्कादायक घटना घडली. या राड्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्वामी समर्थ मंदिर परिसरात आज भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कामाच्या श्रेयवादावरून आजी माजी आमदारांचे गट आमने-सामने आले. भाजपचे विवेक कोल्हे आणि राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांच्या समर्थकांमध्ये हा वाद जुंपला. विशेष म्हणजे दोन्ही गटांनी एकाच वेळी भूमिपूजनाचे नियोजन केल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले आणि त्यांच्यात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. पाहता पाहता या वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. भाजप नेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीतच कार्यकर्त्यांमध्ये ही चकमक घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच कोपरगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना पांगवत परिस्थिति नियंत्रणात आणली. साध्या परिसरात शांतता असली तर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोपरगावात गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हे आणि काळे गटात विकासकामांच्या श्रेयवादावरून कलगीतुरा रंगत आहे. आजच्या घटनेमुळे हा संघर्ष आता थेट रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी काळात ही राजकीय लढाई अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.