अकोल्यात तरुणाची भररस्त्यात हत्या
जुन्या वादातून झालेल्या भांडणानंतर आरोपींनी धारदार शस्त्राने हल्ला केला
पोलिस तपास सुरु आहे
हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले
अमर घटारे, अकोला
अकोला शहरात जुन्या वादातून एका २९ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धक्कादायक म्हणजे, अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तार फैल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात घडली. मृत तरुणाचे नाव अंकुश गोपालनंदा गवली असे आहे. अंकुश हा अशोक नगर येथील रहिवासी होता. तो राहत असलेल्या ठिकाणी मागील काही दिवसांपासून त्याचा काही व्यक्तींशी वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान अंकुश डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात असताना दोन जणांनी त्याला गाठले. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर आरोपींनी धारदार शस्त्राने अंकुशवर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेला अंकुश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अंकुशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, रामदासपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिरीष खंडारे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे गोळा केले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान, या हत्येमागे जुना वाद तसेच अनैतिक संबंधांशी संबंधित कारणे असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.