अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी
सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन हे ब्रीद मिरवणाऱ्या पोलिस दलालाच हादरा देणारा प्रकार अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात उघडकीस आल्याचा आरोप आहे. लॉकअपमध्ये असलेल्या आरोपी महिलेकडे तिच्या २७ वर्षीय मुलीला पैशांच्या मोबदल्यात “एका रात्रीसाठी” पाठवण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप ड्युटीवरील एएसआयवर झाला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अकोला शहरात खळबळ उडाली आहे.
सायबर गुन्ह्यातील प्रकरणात अटक झालेली महिला मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजता लॉकअपमध्ये असताना संबंधित अधिकाऱ्याने तिच्याकडे मुलीचे वय विचारले. “२७ वर्षे आहे,” असे उत्तर दिल्यानंतर “दहा हजार रुपये देतो, एका रात्रीसाठी पाठव,” असा कथित अश्लील प्रस्ताव दिल्याचा महिलेचा दावा आहे. “गुन्हा मी केला आहे, माझ्या मुलीने नाही,” असे म्हणत तिने संताप व्यक्त केला.
व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित एएसआय आरोप फेटाळताना “मी असे एक शब्द बोललो का? फालतू काही करू नको,” असे म्हणताना दिसतो. उपस्थित महिला पोलीस कर्मचाऱ्याने “माझ्यासमोर तसे बोलले नाहीत,” असे सांगितल्याचेही ऐकू येते. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवर माहिती देताना गार्डवरील एएसआयने महिलेला मुलीबाबत अयोग्य वक्तव्य केल्याची तक्रार नोंदवल्याचे दृश्य समोर आले आहे. दुसऱ्या क्लिपमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याने संबंधिताला खडसावत “वर्दी घालून असे कृत्य करताना लाज वाटली नाही का,” असा जाब विचारल्याचे दिसते.
लॉकअपसारख्या सुरक्षित ठिकाणी आरोपी महिलेकडे अशा प्रकारची मागणी केल्याचा आरोप अत्यंत गंभीर मानला जात आहे. या प्रकरणामुळे अकोला पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असून कठोर चौकशी व कारवाईची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात एएसआय राजेश जाधव यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय पोलीस अधीक्षक अर्चीत चांडक यांनी तात्काळ जाधव याचे निलंबन देखील केलंय. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हाच राजेश जाधव हा मागच्या दाराने पोलीस ठाण्यातून फरार झाला, सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
राजेश जाधवच्या संदर्भात अनेक गोष्टी कानावर
पोलीस कोठडीत महिला कैद्याला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या निलंबित पोलीस अधिकारी राजेश जाधव संदर्भात राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी खळबजनक दावा केलाय. राजेश जाधवच्या संदर्भात अनेक गोष्टी कानावर आल्यात. मात्र, त्याची तक्रार न झाल्यानेच त्याची हिम्मत वाढल्याचा आरोप डॉ. अशा मिरगे यांनी केलाय. यासोबतच दहा वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीची तक्रार त्याच्या संदर्भातील तक्रार आपल्याकडे आली असल्याचा गौप्यस्फोट डॉ. मिरगे यांनी केलाय. आरोपी पोलीस अधिकारी राजेश जाधव यांच्यावर अकोला पोलिसांनी त्वरित केलेल्या कारवाईचा डॉ. मिरगे यांनी कौतुक केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.