cabinet expansion : सहा मंत्रालय महत्त्वाची का? कोणाला कोणतं खातं मिळणार?

Maharashtra government cabinet expansion : शपथविधी सोहळा पार पडला, खातेवाटप कधी होणार? मंत्रिमंडळ विस्ताराचे काय? तीन पक्षाला कोणती महत्त्वाची खाती मिळणार? याची चर्चा सुरू आहे.
Mahayuti News
Mahayuti NewsSaam Tv
Published On

Maharashtra government cabinet expansion news : मुंबई : (Maharashtra Assembly 2024) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला. भाजपच्या 132, शिवसेनेच्या 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 41 जागा मिळाल्यानंतर तीनही पक्षांमध्ये प्रमुख मंत्रालयांसाठी चुरस सुरू आहे. गुरुवारी झालेल्या शपथविधीपर्यंत शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांनी गृहखाते आणि उपमुख्यमंत्रीपदासाठी आपली भूमिका ठाम ठेवली होती. परंतु, भाजपच्या योजनेनुसार त्यांना गृह आणि नगरविकास खात्यांपैकी एक निवडण्याचा पर्याय देण्यात आला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मागील महायुती सरकारमध्ये अर्थ आणि गृह निर्माण खात्यांचे यशस्वी कामकाज केले होते. यावेळीही ते अर्थखात्याची मागणी करत आहेत. (Why are the six ministries important Who will get which Mantralaya)

महत्त्वाची सहा मंत्रालये आणि त्यांचे महत्त्व

1. गृहखाते

गृहखाते हे राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये सर्वाधिक महत्त्वाचे मानले जाते. यामुळे पोलीस दलावर नियंत्रण राहते, तसेच राजकीय स्थैर्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावता येते. कायदा आणि सुव्यवस्थेचे चांगले व्यवस्थापन राज्यात गुंतवणुकीसाठी पूरक ठरते. मागील महायुती सरकारमध्ये हे खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते.

2. अर्थखाते

गृहखात्यानंतर सर्वाधिक मागणी असलेले खाते म्हणजे अर्थखाते. निधी वितरण, प्रकल्पांना मंजुरी आणि इतर खात्यांवरील नियंत्रण या सर्व गोष्टी अर्थमंत्र्यांच्या अखत्यारीत येतात. मागील सरकारमध्ये हे खाते अजित पवार यांच्याकडे होते आणि यावेळीही ते तेच खाते मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.

3. नगरविकास खाते

नगरविकास खाते हे शहरी भागातील पायाभूत प्रकल्पांसाठी महत्त्वाचे आहे. मुंबईसह सर्व महापालिकांवर नियंत्रण हे या खात्याच्या अखत्यारीत येते. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुका जवळ आल्याने या खात्यावर चुरस अधिक आहे. मागील सरकारमध्ये हे खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे होते.

4. महसूल खाते

महसूल खाते जमिनीशी संबंधित सर्व धोरणे, खरेदी-विक्री प्रक्रिया, कर संकलन आणि नव्या उत्पन्न स्रोतांवर नियंत्रण ठेवते. जिल्हाधिकाऱ्यांवर नियंत्रण असल्याने हे खाते अधिक महत्त्वाचे ठरते.

5. गृह निर्माण खाते

मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पासह विविध मोठ्या प्रकल्पांची जबाबदारी गृह निर्माण खात्याची आहे. या खात्यामार्फत लाखो कोटींची गुंतवणूक होत असल्याने ते महत्त्वाचे मानले जाते.

6. जलसंपदा खाते

जलसंपदा खाते हे प्रामुख्याने शेतकऱ्यांशी संबंधित असून, सिंचन प्रकल्पांद्वारे मतदारांशी नाते मजबूत करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. विदर्भातील नलगंगा-वैनगंगा नदीजोड प्रकल्प यामुळे चर्चेत आहे.

संभाव्य विभागाचे वाटप अशा प्रकारे होऊ शकते

गृहखाते: भाजप

अर्थखाते: अजित पवार

नगरविकास: शिवसेना

महसूल: भाजप

गृह निर्माण: शिवसेना किंवा राष्ट्रवादी

जलसंपदा: भाजप

मंत्रालयांचे वाटप अंतिम होईपर्यंत महायुतीतील रस्सीखेच सुरूच राहणार आहे.

Edited By- नितीश गाडगे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com