सचिन बनसोडे, साम टीव्ही
अवघ्या तीन महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या एका जोडप्याने झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडली. रविवारी (ता. ११) दुपारी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली. वैभव आमले आणि स्नेहा आमले अशी मृत पती पत्नीची नावे आहेत.
त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) गुन्ह्याची नोंद केली असून घटनेचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत वैभव आमले आणि स्नेहा आमले हे संगमनेर तालुक्यातील साकुर येथील रहिवासी होते.
अगदी तीन महिन्यांपूर्वीच दोघांचा विवाह झाला होता. विवाहानंतर दोघेही पुणे शहरातील (Pune) एका खासगी कंपनीत नोकरी करीत होते. काही दिवसांपूर्वी दोघेही अचानक गावी निघून आले. रविवारी सायंकाळच्या सुमारास त्यांनी मुळा नदीच्या जवळील मांगमळीत झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.
दरम्यान, वैभव आणि स्नेहा यांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत एका गावकऱ्याला दिसून आला. त्याने आरडाओरड केली असता आसपासचे लोक धावून आले. वैभव आणि स्नेहाने आत्महत्या केल्याची घटना संपूर्ण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली.
गावकऱ्यांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. माहिती मिळताच घारगाव पोलीस घटनास्थळी हजर झाले. दोघांचेही मृतदेह खाली उतरून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून घटना कशामुळे घडली याचे कारण अद्याप मात्र समजू शकले नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.