नवापूर महामार्गावर आयशर टेम्पो–ट्रक भीषण अपघात
धुळ्याचे ३ तरुण गंभीर जखमी, रक्ताच्या थारोळ्यात पडले
ॲड. अविनाश पाटील यांनी क्षणात मदत करून रुग्णालयात हलवले
RTO अधिकाऱ्यांकडून 25 हजारांचे रोख बक्षीस जाहीर
सागर निकवडे, नंदुरबार
नंदुरबारमधील नवापूर शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर अपेक्स हॉटेलजवळ आयशर टेम्पो आणि मालवाहू ट्रक यांच्यात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. या भीषण अपघातात धुळ्याचे तीन तरुण मृत्यूच्या दारात असतानाच ॲडव्होकेट अविनाश पाटील यांनी देवदूता सारखे धावून येत त्यांचे प्राण वाचवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर आयशर टेम्पो आणि मालवाहू ट्रक यांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत धुळ्याचे योगेश राजेंद्र माळी, राकेश भील आणि आजेश हे तिघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
मदतीसाठी कुणी पुढे येत नसताना, त्याच मार्गावरून जाणारे ॲड.अविनाश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली खाजगी गाडी थांबवली. स्वतःच्या गाडीतून त्यांनी या तिन्ही जखमींना तातडीने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवले. त्यांच्या या तत्परतेमुळे जखमींना वेळेवर उपचार मिळणे शक्य झाले.
या घटनेची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी तातडीने रुग्णालय गाठले. संकटाच्या काळात माणुसकी जपत दाखवलेल्या या धाडसाचे कौतुक म्हणून जाधव यांनी ॲड. पाटील यांना 25 हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. या घटनेमुळे परिसरात ॲड.अविनाश पाटील यांच्या संवेदनशीलतेचे आणि धाडसाचे मोठे कौतुक होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.