Periodic Assessment Test News: राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठं वृत्त हाती आलं आहे. राज्यातील तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आता ३ मूल्यांकन चाचण्या द्याव्या लागणार आहेत. या मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी आणि दोन संकलित मूल्यमापन चाचण्या अशा एकून ३ चाचण्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता १७ ते १९ ऑगस्टदरम्यान पायाभूत चाचणी होणार आहे. तसेच अन्य दोन चाचण्या ऑक्टोबर आणि एप्रिल महिन्यात घेतल्या जाणार आहेत, असे विद्या प्राधिकरणाने जाहीर केले आहे. (Latest Marathi News)
शासकीय आणि जिल्हा परिषद, नगर परिषदासारख्या स्थानिक स्वराज संस्थांच्या शाळांतील तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ३ शैक्षणिक प्रगती चाचण्या घेण्यात येणार आहेत. या चाचण्या मागील वर्षीच्या इयत्तेचा अभ्यासक्रम आणि मुलभूत क्षमता यावर आधारित असणार आहे.
तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणीमध्ये १७ ऑगस्टला भाषा विषयावर होणार आहे. तसेच १८ ऑगस्टला गणित आणि १९ ऑगस्ट रोजी इंग्रजी विषयाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
पहिली संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाईल. दुसरी संकलित मूल्यमापन चाचणी एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे नियोजन आहे, असे विद्या प्राधिकरणाने म्हटले आहे.
राज्यभरातील शाळांना पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिकांसोबत शिक्षक सूचनापत्र, विषयनिहाय, शाळानिहाय आणि इयत्तानिहाय उत्तरसूची पुरवण्यात येणार आहे. या चाचण्या दहावी किंवा बारावीच्या परीक्षेप्रमाणे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त ताण देऊ नये, अशी सूचना देखील विद्या प्राधिकरणाने केली आहे. प्रश्नपत्रिका फाटणार किंवा भिजणार नाहीत, याची दक्षता घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
अध्यापन प्रक्रिया सुलभ करण्यास मदत व्हावी, हा या चाचण्यांचा मुख्य हेतू असणार आहे. या चाचण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्ती संपादणूक पडताळणे आणि राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणातील संपादणूक वाढवण्यास मदत होणार आहे.
तसेच अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी कृती कार्यक्रम तयार करणे हा या चाचण्यांचा उद्देश आहे. या चाचण्यांच्या माध्यमातून विषयनिहाय राज्याची संपादणूक स्थिती समजून घेतली जाणार आहे, अशी माहिती देखील विद्या प्राधिकरणाने दिली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.