Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Maharashtra Assembly Election 2024 : कांद्याच्या महागाईचा महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे. असे आहे कांद्याचे राजकारण
Maharashtra Election 2024
OnionSaam Tv
Published On

मुंबई : (Maharashtra Assembly Election 2024) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये शब्द युद्ध सुरूच आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी 288 सदस्यीय विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे महाराष्ट्राच्या निवडणुकीत एकएक मुद्दा जोर धरत आहे, त्यापैकीच एक म्हणजे कांदा. स्वयंपाक घराचा अविभाज्य भाग असलेला कांदा एकेकाळी इराण किंवा मध्य आशियातून जगभरात निर्यात होत होता. या कांद्याने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला रडवले होते. जिथे भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीला कांदा उत्पादक भागात एकूण 13 पैकी 12 जागा गमवाव्या लागल्या. मात्र आता कांद्याचा हा ट्रेंड बदलत आहे. नवभारत टाइम्सने याबाबतचे वृत्त दिलेय.

वास्तविक, कांद्याचे दर अनेक दिवसांपासून वाढत आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये 60 रुपये प्रति किलोपासून ते देशातील इतर अनेक भागांमध्ये 100 रुपयांच्या पुढे गेले आहे. हा कांदा लोकसभा निवडणुकीप्रमाणे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीची निराशा करणार की विजयाची चव चाखणार याबद्दल जाणून घेऊया.

निवडणूक, कांदा आणि राजकारण

या वर्षी सप्टेंबरामध्ये, केंद्र सरकारने कांदा आणि बासमती तांदळावरील निर्यात बंदी उठवली होती, ज्याला महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात होते. या निर्णयाचा परिणाम या वर्षी ऑक्टोबरमध्ये हरियाणा निवडणुकीत दिसून आला, जिथे भाजपने एक्झिट पोलचे सर्व अंदाज धुडकावून लावत मोठा विजय मिळवला. महाराष्ट्राच्या निवडणुकीतही तज्ज्ञ असाच अंदाज लावत आहेत, कारण निर्यातबंदीमुळे देशात कांद्याचे भाव महागले असले तरी, परदेशात कांदा पाठवून महाराष्ट्राच्या कांदा पट्ट्याला मोठा फायदा होत आहे.

2019 मध्ये कांदा पट्ट्यात भाजप आघाडीवर 

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, कांदा उत्पादक भागातील एकूण 35 विधानसभा जागांपैकी 13 मतदारसंघ जिंकून भाजप आघाडीवर आहे. त्यानंतर अविभाजित शिवसेनेने 6, अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसने 7, काँग्रेसने 5 तसेच AIMIM ने दोन जागा जिंकल्या. दोन जागा अपक्षांनी जिंकल्या.

लोकसभा निवडणुकीत कांद्यामुळे गमवाव्या लागल्या 12 जागा 

लोकसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीला कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दिंडोरी, नाशिक, बीड, औरंगाबाद, अहमदनगर आणि धुळे या भागांमध्ये 13 पैकी 12 जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले. या सहा जिल्ह्यांतून लोकसभेची एकच जागा जिंकता आली. देशातील कांदा उत्पादनात या कांदा पट्ट्याचा वाटा अंदाजे 34 टक्के आहे. महाराष्ट्रातील कांदा श्रीलंका, यूएई आणि बांगलादेशलाही जातो.

कांदा दरवाढीमागे नेमके कारण काय?

देशातील सर्वाधिक कांदा उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे लाल कांद्याचे नवीन पीक येण्यास विलंब झाला आहे. यामुळे विशेषत: दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदीगड या उत्तर भारतीय राज्यांमध्ये पुरवठ्याची कमतरता आहे. व्यापाऱ्यांच्या मते, येत्या 15 ते 20 दिवसांत नवीन पीक आल्याने कांद्याच्या देशांतर्गत किमती घसरतील. गेल्या वर्षी रब्बी हंगामात पेरलेल्या कांद्याचे पीक मार्च 2024 पर्यंत काढले गेले. ते गोदामात साठवले गेले. हा जुना साठा आता संपला आहे. त्याचबरोबर नवीन पीक येण्यास अजून वेळ लागत आहे. मागणी आणि पुरवठा यांच्यात ताळमेळ नसल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत.

या कारणासाठी निवडणूकीत कांदा मुद्दा महत्त्वाचा

महाराष्ट्रातील निवडणुकीच्या राजकारणात कांदा हा एक मोठा मुद्दा ठरेल कारण तो एका वर्षात तीन टप्प्यात पिकतो. महाराष्ट्रातील शेतकरी त्यांच्या खरीप कांदा पिकाची पेरणी जून आणि जुलैमध्ये करतात. ऑक्टोबरपासून त्याची काढणी केली जाते. तर, उशिरा कांद्याची पेरणी सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान केली जाते आणि डिसेंबरनंतर काढणी केली जाते. कांद्याचे सर्वात महत्त्वाचे रब्बी पीक डिसेंबर ते जानेवारी या काळात पेरले जाते आणि मार्चनंतर काढणी केली जाते. कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे निवडणूकीच्या दृष्टीनेही हा मुद्दा महत्त्वाचा आहे. 

Edited By- नितीश गाडगे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com