सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. आपआपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी दोन्ही आघाड्यांकडून जोरदार प्रचारसभा घेतल्या जात आहेत. महायुतीच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रचारात उतरले आहेत.
दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील प्रचारसभांचा धडाकाच लावला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर महाराष्ट्रात ही पहिलीच निवडणूक असल्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपली संपूर्ण ताकद लावली आहे. दरम्यान, सध्या राज्यात चर्चेत असलेला माढा लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी शरद पवार यांनी मोठी रणनिती आखली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार तब्बल ६ सभा घेणार आहेत. माढा तालुक्यातील मोडनिंब, सांगोला , करमाळा याठिकाणी २६ एप्रिल रोजी शरद पवार (Sharad Pawar) सभा घेणार आहेत. तर ३० एप्रिलला फलटण आणि दहीवडीत शरद पवारांची सभा होणार आहे.
२ मे रोजी शरद पवार अकलूज येथे शेवटची सभा घेणार आहेत. एकाच मतदार संघात शरद पवार सहा सभा घेत असल्याने माढाचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे. दुसरीकडे माढ्यात विजय मिळवण्यासाठी भाजपने देखील मोठा प्लान आखला आहे. माढा तालुक्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे आमदार बबन शिंदे आणि शिवसेनेचे नेते प्रा. शिवाजी सावंत यांना भाजपला एकत्रित आणलं आहे.
माढा लोकसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात असून यंदाही भाजपने या मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विजयासाठी राज्यातील भाजप नेते मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यामुळे माढा लोकसभा निवडणुकीत नेमका कोणत्या पक्षाचा विजय होणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.