काँग्रेसची सत्ता असताना देशात बॉम्बस्फोट व्हायचे. दहशतवादी गोळ्या झाडायचे. तेव्हा निर्दोष व्यक्ती मारले जात होते. त्यावेळी दिल्लीतील सरकार पाकिस्तानला लव्ह लेटर पाठवत होती, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी (Rahul Gandhi) पंतप्रधान व्हावेत यासाठी पाकिस्तानमधील नेते प्रार्थना करीत आहेत, अशी टीकाही मोदींनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज झारखंड दौऱ्यावर असून भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ त्यांनी पलामू येथील चिआंकी विमानतळ मैदानावर जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला. उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, "तुमच्या एका मताने २०१४ मध्ये काँग्रेसचे भ्रष्ट सरकार हटवले. त्यानंतर देशात भाजप-एनडीएचे सरकार स्थापन झाले".
"२०१४ नंतर देशातील परिस्थिती बदलली आहे. तुमच्या मताच्या ताकदीमुळे भारताची जगात ताकद वाढली आहे. पिढ्यांपिढ्या प्रलंबित असलेला राम मंदिराचा प्रश्न सुटला आहे. तब्बल ५०० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अयोध्येत भव्य राम मंदिर (Ram Mandir) बांधण्यात आलं आहे. एवढा मोठा संघर्ष जगात कुठेही झाला नाही".
"तुमच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून देशवासीयांची सेवा केली. त्याला आता २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या २५ वर्षांत माझ्यावर एका पैशाचा घोटाळा झाल्याचा आरोप नाही. पद, प्रतिष्ठा, सुख-समृद्धी यापासून दूर राहूनही आजही मी तसाच आहे. माझा जन्म मौजमजेसाठी नाही तर मिशनसाठी झाला आहे".
"देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला होता. काँग्रेसच्या काळात देशात बॉम्बस्फोट व्हायचे. दहशतवादी गोळ्या झाडून अनेक निष्पाप लोकांना मारायचे. तेव्हा काँग्रेस सरकार पाकिस्तानला लव्ह लेटर पाठवत होते. जेवढे लव्ह लेटर पाठवले, तेवढेच दहशतवादी भारतात घुसायचे"
"पण २०१४ नंतर परिस्थिती बदलली आहे. हा नवा भारत असून घरात घुसून मारत आहे. सर्जिकल स्ट्राईने पाकिस्तानला हादरवून टाकलं आहे. त्यामुळे आता भारताला कुणीतरी रोखावं, असं म्हणत पाकिस्तान जगभर रडत फिरत आहे. मदतीसाठी इतर देशांकडे याचना करीत आहे. मोदींची सत्ता जावी ही पाकिस्तानची इच्छा असून राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, यासाठी पाकिस्तानमधील नेते प्रार्थना करीत आहेत", असं मोदींनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.