ठाण्यामध्ये भंगारात जमा झालेले ईव्हीएम मशीन (EVM Machine) वापरलं जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सापडलेल्या भंगारजमा ईव्हीएम मशीन आणि मतदान कार्डचा व्हिडीओ सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. अशामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये भंगारामध्ये जमा झालेले ईव्हीएम मशीन्स आणि हजारो मतदान कार्ड सापडल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. २०१४ पासून या वस्तू दादोजी कोंडदेव स्टेडिअमच्या स्टोअर रुममध्ये पडून असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
हा व्हिडीओ पोस्ट करत जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महानगर पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सडकून टीका केली आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'लोकशाहीचा खून का करताय? ठाण्यात काय चाललंय बघा.' जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टनंतर प्रतिक्रिया देत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, 'ईव्हीएम जेव्हा तुम्हाला जमा करायचे असतात. तेव्हा निवडणूक आयोगाकडे ईव्हीएमचा हिशोब असतो. मग हे ईव्हीएम आले कुठून? मतपत्रिका वाटण्यासाठी म्हणून महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दिले जातात. या मतपत्रिका इथे ठेवल्या कशा गेल्या?', असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.
तसंच, 'ईव्हीएम हे मॅनेजमेंट आहे. आजही सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला आहे. सर्वोच्च न्यायालय हे सुप्रीम आहे. या निकालाने लोकशाहीचे भले होणार नाही. मी दिलेले मत कोणाला जाते हे मला कळाले पाहिजे.', असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाने आम्ही खूश नसल्याचे मत व्यक्त केले.
त्याचसोबत, ' तुम्ही दिलेल्या ईव्हीएम मशीनची टोटल आली पाहिजे. तुम्ही निवडणूक आयोगाकडून किती ईव्हीएम मशीन घेतले आणि परत किती दिले याची सगळी टोटल मॅच झाली पाहिजे. हे सर्व संशयास्पद आहे. पण कोर्टाने त्याच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे आता बोलायचे काय?', असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.