लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन महिनाभराचा कालावधी उलटला. पहिल्या टप्प्यातील मतदान सुरळीत पार पडल्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. मात्र, असं असूनही महायुतीचा काही जागांवरील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार नेमका कोण असणार, याबाबत मतदारांमध्ये अद्यापही संभ्रम आहे.
नाशिक लोकसभेची जागा सध्या शिवसेना शिंदे गटाकडे (Eknath Shinde) आहे. याठिकाणी हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत. मात्र, या जागेवरून भाजपचा उमेदवार द्यावा, अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यातच अजित पवार गटाने सुद्धा या जागेवर आपला दावा केला आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी बोलून दाखवली होती. मात्र, त्यानंतर मागील आठवड्यात त्यांनी माघार देखील घेतली. परंतु आता राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आला आहे. यामुळे नाशिक लोकसभेचा तिढा आणखी वाढला आहे.
नाशिकच्या जागेसाठी गुरुवारी (ता. २५) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या (Ajit Pawar) नेत्यांनी महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत अजित पवार गटाने महायुतीला नवा प्रस्ताव दिला आहे. छगन भुजबळ यांच्या माघारीनंतर नाशिकमधून अजित पवार गटाने महायुतीकडे दोन उमेदवारांची नावे सूचवली आहे.
माजी खासदार देविदास पिंगळे आणि सिन्नरचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नावाचा प्रस्ताव अजित पवार गटाने महायुतीला दिला आहे. नाशिकची जागा आम्हालाच मिळायला हवी, आमच्याकडे ताकतीचे उमेदवार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.
अजित पवार गटाच्या या नव्या प्रस्तावामुळे शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे. हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी द्यावी, असं शिंदे गटाचं म्हणणं आहे. दरम्यान, आजपासून नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे या जागेचा तिढा नेमका सुटणार तरी कधी? असा सवाल महायुतीचे कार्यकर्ते विचारत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.