Heart attack: हार्ट अटॅक येण्याआधी शरीर देतं हे ५ संकेत; ॲसिडिटी आणि थकवा समजून दुर्लक्ष केल्यास पडेल महागात

Early heart attack symptoms: हार्ट अटॅकची लक्षणं नेहमी तीव्र छातीत दुखण्यासारखी नसतात. छातीत जळजळ, अचानक थकवा, धाप लागणे, जास्त घाम येणे, चक्कर किंवा अस्वस्थता याकडे दुर्लक्ष करू नका. महिला, वयस्कर आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींनी ही लक्षणं गांभीर्याने घ्यावीत.
Heart attack
Heart attacksaam tv
Published On: 

हार्ट अटॅक म्हटलं की, टीव्हीवर दाखवल्याप्रमाणे छाती घट्ट पकडणं किंवा खूप तीव्र वेदना होणं, असंच प्रत्येक वेळी घडतं असं नाही. अनेक वेळा हार्ट अटॅकची सुरुवात अगदी सौम्य लक्षणांनी होते. ही लक्षणं रोजच्या अंगदुखीसारखी वाटू शकतात. कधी हेवी जेवण झाल्यासारखं वाटतं, तर कधी खूप काम केल्यामुळे थकवा आला आहे असं वाटू शकतं.

हा संभ्रम का निर्माण होतो?

नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजिस्ट डॉ. अमित सिंग यांनी सांगितलं की, आपल्या शरीरातील स्नायू, पोट आणि हृदय यांच्याकडून मेंदूकडे जाणारे वेदनांचे संदेश काही प्रमाणात एकाच मार्गाने जातात. त्यामुळे कधी कधी मेंदूला हृदयातून येणारी वेदना ही पोटाची समस्या किंवा स्नायूंमध्ये झालेली दुखापत वाटू शकते.

Heart attack
Hypertension: वयाच्या 30व्या वर्षीही होतो हाय BPचा त्रास; लक्षणं दिसत नसली तरी 'इतक्या' वेळा तपासा रक्तदाब

हार्ट अटॅकची काही सामान्य लक्षणे ज्यांना आपण ॲसिडिटी समजतो

छातीत किंवा वरच्या पोटात जळजळ होणं

हे हार्ट अटॅकच्या अशा लक्षणांपैकी एक आहे, ज्याचा अनेकदा चुकीचा अर्थ लावला जातो. ॲसिडिटीमुळे पोटातील आम्ल वर आल्यावर आणि हार्ट अटॅकच्या वेळीही छातीच्या हाडामागे जळजळ किंवा आग होत असल्यासारखं वाटू शकतं. ॲसिडिटीचा त्रास अनेकदा जेवल्यानंतर किंवा झोपल्यानंतर वाढतो आणि ॲन्टॅसिड औषध घेतल्यावर कमी होऊ शकतो. हृदयाशी संबंधित वेदना व्यायाम करताना, मानसिक ताण असताना किंवा अगदी शांत बसलेले असतानाही सुरू होऊ शकतात.

पोट फुगणं

हार्ट अटॅकच्या वेळी होणारी मळमळ अनेकदा घाम येणं, चक्कर येणं किंवा धाप लागणं यांसारख्या इतर लक्षणांसोबत दिसू शकतं. साध्या अपचनाच्या त्रासात सहसा अशी लक्षणं एकत्र दिसत नाहीत.

हार्ट अटॅकची सामान्य लक्षणं ज्यांना 'थकवा' समजलं जातं

नेहमीपेक्षा वेगळा थकवा

तुमच्या कामाच्या तुलनेत कारण नसताना खूप जास्त थकवा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. महिलांमध्ये असा थकवा हार्ट अटॅकच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक असू शकतो. हा नेहमीचा थकवा नसतो.

शारीरिक हालचालीनंतरही धाप लागणं

पूर्वी सहज चढता येणाऱ्या काही पायऱ्या चढताना किंवा थोडं अंतर चालतानाही अचानक धाप लागत असेल तर त्याला फक्त शरीराची क्षमता कमी झाली आहे असं समजू नका. हा त्रास नवीन असेल किंवा अचानक वाढला असेल तर त्याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे.

Heart attack
Blood sugar control: डायबिटीजमध्ये 3 छोट्या चुका पडू शकतात महागात; ब्लड शुगर वाढू नये यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

आराम करत असताना प्रचंड घाम येणं

हवामान गरम नसताना आणि कोणतेही शारीरिक काम केलेले नसतानाही अचानक खूप घाम येत असेल तर त्याकडे लक्ष द्या. अगदी विश्रांती घेताना किंवा थोडीशी हालचाल करतानाही अचानक जास्त प्रमाणात घाम येणं धोक्याचं असू शकतं.

चक्कर येणं किंवा अस्वस्थ वाटणं

काही लोकांना चक्कर येण्यासोबतच मनात ‘काहीतरी चुकीचं होत आहे’ अशी भावना जाणवू शकते. इतर लक्षणांसोबत अशी अस्वस्थता जाणवत असेल तर ती दुर्लक्ष करण्यासारखी नाही.

कोणाची अधिक काळजी घेणं गरजेचं?

महिला, वयस्कर व्यक्ती आणि मधुमेह असलेल्या लोकांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं नेहमीसारखी दिसतीलच असं नाही. त्यांना छातीत खूप तीव्र वेदना किंवा छातीवर दाब जाणवण्याऐवजी वेगळी आणि सहज ओळखता न येणारी लक्षणं दिसू शकतात.

Heart attack
High Blood Pressure: रात्रीच्या वेळी अचानक BP वाढतोय? झोपण्यापूर्वी ही 3 ड्रिंक्स प्या

तातडीने वैद्यकीय मदत कधी घ्यावी?

खालीलपैकी कोणतेही लक्षण जाणवलं तर लगेच आपत्कालीन वैद्यकीय मदत घ्या-

  • छातीच्या खालच्या भागात अस्वस्थता जाणवणं

  • वेदना पसरणं

  • धाप लागणं

  • इतर तीव्र लक्षणं

  • लक्षणांचं वेगळं स्वरूप

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com