Winter Foot Care : हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्यामागे फक्त कोरडेपणा नाही, 'ही' ८ कारणेही असू शकतात

Winter Cracked Heels : हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याची समस्या अनेकांना जाणवते. मात्र, यामागे केवळ त्वचेचा कोरडेपणा नसून शकतो. टाचांच्या भेगांमागील संभाव्य कारणे आणि योग्य काळजी घेण्याचे उपाय जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
Winter Cracked Heels
Winter Foot Care AI PHOTO
Published On: 

हिवाळा सुरू झाला की अनेकांना टाचांना भेगा पडण्याची समस्या जाणवते. टाचांची त्वचा कोरडी होणे, त्वचा निघणे आणि चालताना वेदना होणे अशा समस्या उद्भवतात. अनेकजण याकडे केवळ त्वचेचा कोरडेपणा समजून दुर्लक्ष करतात. मात्र, प्रत्येक वेळी टाचांना भेगा पडण्यामागे कोरडी त्वचाच कारणीभूत असते असे नाही. काही वेळा मधुमेह, थायरॉईडशी संबंधित समस्या, त्वचेचे आजार किंवा पायांवर सतत पडणारा दबाव यामुळेही टाचांना भेगा पडू शकतात. त्यामुळे टाचांच्या भेगांकडे दुर्लक्ष न करता त्यामागील कारणे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

टाचांना भेगा पडण्यामागील ८ कारणे

मधुमेह

मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये टाचांना भेगा पडण्याचा धोका वाढू शकतो. रक्तातील साखरेचे प्रमाण दीर्घकाळ जास्त राहिल्यास त्वचेवर आणि नसांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पायांची त्वचा कोरडी पडणे, जखमा उशिरा भरणे आणि भेगांमधून संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

थायरॉईडची समस्या

हायपोथायरॉईडिझम म्हणजेच थायरॉईड ग्रंथी कमी सक्रिय असल्यास त्वचा कोरडी आणि खरखरीत होऊ शकते. त्वचेची लवचिकता कमी झाल्यास टाचांवर भेगा पडण्याचा धोका वाढू शकतो.

एक्झिमा

एक्झिमा हा त्वचेशी संबंधित आजार आहे. यामध्ये त्वचेवर खाज, लालसरपणा, कोरडेपणा आणि जळजळ जाणवू शकते. पायांच्या तळव्यांवर किंवा टाचांवर एक्झिमा असल्यास त्वचा फाटून भेगा पडू शकतात.

सोरायसिस

सोरायसिसमध्ये त्वचेच्या पेशींची वाढ वेगाने होते. त्यामुळे त्वचेवर जाड, कोरडे आणि खवलेदार थर तयार होतात. विशेषतः पायांच्या तळव्यांवर सोरायसिस असल्यास टाचांवर खोल भेगा पडू शकतात.

बुरशीजन्य संसर्ग

पायांमध्ये बुरशीचा संसर्ग झाल्यास त्वचा सोलणे, खाज येणे, जळजळ होणे आणि त्वचेला भेगा पडणे अशा समस्या जाणवू शकतात. विशेषतः बोटांच्या मधील भागात आणि पायांच्या तळव्यांवर अशी लक्षणे दिसू शकतात.

शरीराचे वाढलेले वजन

शरीराचे वजन जास्त असल्यास चालताना टाचांवर अधिक दबाव पडतो. त्यामुळे टाचेच्या खालच्या भागातील मऊ ऊती बाजूला पसरतात आणि त्वचेवर ताण निर्माण होतो. त्वचा जाड व कमी लवचिक झाल्यास भेगा पडू शकतात.

सतत उभे राहण्याची सवय

कामानिमित्त अनेक तास उभे राहावे लागत असल्यास टाचांवर सतत दबाव पडतो. विशेषतः कठीण जमिनीवर अनवाणी चालणे किंवा बराच वेळ उभे राहणे यामुळे टाचांची त्वचा जाड होऊन भेगा पडण्याची शक्यता वाढते.

चुकीच्या चप्पलांचा वापर

सतत चप्पल किंवा मागून उघडे असलेले सँडल वापरल्यास टाचांना योग्य आधार मिळत नाही. त्यामुळे चालताना टाचेच्या त्वचेवर ताण आणि दबाव वाढतो. योग्य आकाराची आणि टाचांना आधार देणारी पादत्राणे वापरणे गरजेचे आहे.

Winter Cracked Heels
Bed Mattress Replace : बेडची गादी किती वर्षांनी बदलावी? अन्यथा तुमच्या त्रासाचं ठरेल कारण; कशी ओळखायची एक्सपायरी डेट?

टाचांच्या भेगा कमी करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?

  • दररोज अंघोळीनंतर टाचांना मॉइश्चरायझर लावा.

  • युरिया असलेले मॉइश्चरायझिंग क्रीम डॉक्टरांच्या किंवा फार्मासिस्टच्या सल्ल्याने वापरा.

  • रात्री झोपण्यापूर्वी टाचांना पेट्रोलियम जेली लावा आणि सुती मोजे घाला.

  • खूप गरम पाण्याने पाय धुणे टाळा.

  • अनवाणी चालण्याऐवजी योग्य पादत्राणे वापरा.

  • टाचांवरील जाड त्वचा ब्लेड किंवा कात्रीने काढू नका.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.