Diabetes Reversal: मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो? सोशल मीडियावरील दाव्यांमध्ये किती तथ्य, डॉक्टरांची महत्त्वाची माहिती

३० दिवसांत मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो का? टाइप १ आणि टाइप २ डायबिटीजमधील फरक, रिमिशनचा अर्थ आणि सोशल मीडियावरील दाव्यांमागील सत्य जाणून घ्या. वजन कमी करणे, व्यायाम आणि योग्य आहारामुळे मधुमेह नियंत्रणात कसा ठेवता येतो, हे जाणून घेऊया.
Diabetes Reversal
Diabetes Reversalsaam tv
Published On: 

मधुमेह म्हणजेच डायबिटीज झाल्यानंतर अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो, तो म्हणजे हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो का? सोशल मीडियावर अनेक व्हिडिओंमध्ये ३० दिवसांत मधुमेह बरा करण्याचा दावा केला जातो. काही लोक विशिष्ट पदार्थ खाण्याचा, तर काही जण औषधं बंद करण्याचा सल्ला देतात.

असे व्हिडिओ पाहून अनेक रुग्णांच्या मनात आशा निर्माण होते. पण या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? खरंच मधुमेहापासून कायमची सुटका होऊ शकते का? याबाबत मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या एंडोक्राइनोलॉजी आणि डायबेटोलॉजी विभागातील सल्लागार डॉ. निशा कैमल यांनी महत्त्वाची माहिती दिलीये.

मधुमेहाबाबत बोलताना सर्वात आधी एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. ती म्हणजे मधुमेह पूर्णपणे बरा होणं आणि मधुमेह नियंत्रणात येणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

Diabetes Reversal
Bathroom Vastu Tips: बाथरूममध्ये वॉशिंग मशीन ठेवणं योग्य आहे का? जाणून घ्या वास्तूशास्त्र काय सांगतं? वाचा नियम

मधुमेह रिव्हर्स होणं म्हणजे नेमकं काय?

वैद्यकीय भाषेत मधुमेह रिव्हर्स होण्याला 'रिमिशन' (Remission) असं म्हणतात. याचा अर्थ म्हणजे मधुमेहाची औषधं न घेता किमान तीन महिने रक्तातील साखरेची पातळी सामान्य राहणं. पण याचा अर्थ मधुमेह कायमचा संपला असा होत नाही. शरीरात रक्तातील साखर वाढण्याची जी प्रक्रिया असते ती कायम राहू शकते. त्यामुळे पुन्हा जुन्या खाण्याच्या सवयी सुरू झाल्या किंवा व्यायामाकडे दुर्लक्ष झाले, तर रक्तातील साखर पुन्हा वाढू शकते.

टाइप १ आणि टाइप २ मधुमेहात काय फरक आहे?

मधुमेहाचे टाइप १ आणि टाइप २ असे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. या दोन्ही प्रकारांमध्ये मोठा फरक आहे.

टाइप २ मधुमेह

या प्रकारात शरीरातील इन्सुलिन योग्य पद्धतीने काम करत नाही. याला इन्सुलिन रेझिस्टन्स असे म्हणतात. वजन, व्यायाम, खाण्यापिण्याच्या सवयी, झोप, ताणतणाव, आनुवंशिकता आणि वय अशा अनेक गोष्टींचा यावर परिणाम होतो.

टाइप २ मधुमेह हा जीवनशैलीशी संबंधित आजार आहे. त्यामुळे काही रुग्णांमध्ये हा आजार रिमिशनमध्ये जाऊ शकतो. मधुमेहाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झालं आणि त्याच वेळी योग्य प्रयत्न सुरू केले तर रिमिशन मिळण्याची शक्यता अधिक असते.

टाइप १ मधुमेह

हा आजार शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित आहे. या आजारात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींवर हल्ला करते. त्यामुळे शरीरात इन्सुलिन तयार होणं बंद होतं.

टाइप १ मधुमेह आहार, सप्लिमेंट्स किंवा शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या डिटॉक्स पद्धतींनी बरा होत नाही. त्यामुळे टाइप १ मधुमेह असलेल्या रुग्णांना इन्सुलिन बंद करण्याचा सल्ला देणं चुकीचं आहे. असं केल्यास त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

सोशल मीडियावरील मधुमेहाबाबतच्या दाव्यांमध्ये किती तथ्य?

आज सोशल मीडियावर मधुमेहाबाबत अनेक प्रकारचे दावे केले जातात. पण त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते.

हा एक पदार्थ खाल्ल्याने मधुमेह बरा होतो!

कारले, दालचिनी, ॲपल सायडर व्हिनेगर किंवा वेगवेगळ्या वनस्पतींपासून तयार केलेल्या पावडरमुळे मधुमेह पूर्णपणे बरा होतो, असे दावे केले जातात. काही पदार्थ रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात. पण कोणताही एक पदार्थ मधुमेह पूर्णपणे बरा करू शकत नाही.

मधुमेहाची औषधं घेणं बंद करा

सोशल मीडियावर अनेकदा मधुमेहाची औषधं शरीरासाठी हानिकारक असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे काही रुग्ण स्वतःहून औषधं बंद करण्याचा विचार करतात. मात्र असं करणं धोकादायक आहे.

मधुमेहाची औषधं केवळ रक्तातील साखर नियंत्रणात ठेवत नाहीत तर हृदय, किडनी, डोळे आणि शरीरातील नसांचंही संरक्षण करतात. त्यामुळे औषधांचं प्रमाण कमी करायचं असेल किंवा औषधं बंद करायची असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

खाण्यावर बंधनं घातल्याने मधुमेह बरा होतो

काही लोक मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी खाण्यावर खूप जास्त बंधनं घालतात. काहींना डॉक्टरांच्या देखरेखीखाली अशा आहाराचा फायदा होऊ शकतो. मात्र प्रत्येकासाठी हा आहार योग्य असेलच असं नाही. अशा आहारामुळे रक्तातील साखर अचानक कमी होऊ शकते. शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. इन्सुलिन किंवा रक्तातील साखर कमी करणाऱ्या काही गोळ्या घेणाऱ्या रुग्णांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.

Diabetes Reversal
Winter Foot Itching: थंडीच्या दिवसांत पायांच्या बोटांना खाज सुटतेय? लगेच करा हे 5 घरगुती उपाय, मिळेल आराम

मधुमेह रिमिशनमध्ये आणण्यासाठी काय करावं?

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि टाइप २ मधुमेह रिमिशनमध्ये आणण्यासाठी काही गोष्टी फायदेशीर ठरू शकतात.

वजन कमी करा

ज्यांचं वजन जास्त आहे, त्यांनी हळूहळू आणि सातत्याने वजन कमी करणं महत्त्वाचं आहे. टाइप २ मधुमेह रिमिशनमध्ये जाण्यासाठी वजन कमी करणे हा सर्वात महत्त्वाचा जीवनशैलीतील बदल मानला जातो.

दररोज व्यायाम करा

वेगाने चालणं आणि स्नायू मजबूत करणारे व्यायाम केल्याने शरीराला इन्सुलिनचा योग्य वापर करता येतो. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

पुरेशी झोप घ्या

शरीर निरोगी ठेवण्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे. झोपेकडे दुर्लक्ष करू नका.

ताणतणाव कमी करा

सततचा ताण आरोग्यावर परिणाम करू शकतो. त्यामुळे ताण कमी करण्यासाठी योग्य उपाय करा.

Diabetes Reversal
Winter Foot Itching: थंडीच्या दिवसांत पायांच्या बोटांना खाज सुटतेय? लगेच करा हे 5 घरगुती उपाय, मिळेल आराम

मधुमेह रिमिशनमध्ये आला तरी तपासण्या बंद करू नका!

मधुमेहाची औषधं न घेता रक्तातील साखर सामान्य झाली, तरी नियमित तपासण्या करणं गरजेचं आहे. कारण रिमिशन म्हणजे मधुमेह कायमचा बरा झाला असे नाही. काही काळानंतर रक्तातील साखर पुन्हा वाढू शकते.

त्यामुळे वेळोवेळी रक्ताच्या तपासण्या करणं, डोळ्यांची तपासणी करून घेणं, किडनीचे कार्य तपासणं आणि पायांची काळजी घेणं आवश्यक आहे. रक्तातील साखर पुन्हा वाढू लागल्याचं वेळीच लक्षात आल्यास त्यावर योग्य उपचार करणं सोपे जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.