
पूर्वीच्या काळी हार्ट अटॅक म्हटलं की तो फक्त वयोवृद्ध व्यक्तींना येतो, असा आपला समज व्हायचा. मात्र आता हे चित्र पूर्णपणे बिघडलं आहे. अलीकडच्या काळात तरुण वयोगटातील हृदयविकाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होताना दिसतेय. अनेकजण वयाने तरुण असूनही हृदयविकाराचा झटका येऊन आपला जीव गमावतात.
गुरुग्राममधील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटचे कार्डिओलॉजीचे प्रमुख संचालक डॉ. मनजिंदर सिंग संधू यांनी सांगितलं की, आजचा तरुण वर्ग कामाच्या किंवा अभ्यासाच्या ओझ्याखाली दडलेला आहे. सतत कॉम्प्युटर, मोबाईल किंवा टीव्हीच्या स्क्रीनसमोर बसून राहणं, फिरायला किंवा शारीरिक हालचाल करायला वेळ न मिळणं ही आता एक सामान्य बाब झाली आहे. यासोबत बाजारात मिळणारं जंक फूड, फास्ट फूड, शिळं-तेलकट खाणं, साखर आणि मीठ जास्त असलेले पदार्थ यामुळे शरीरावर ताण वाढतो आणि हृदयावरही परिणाम होतो.
आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा कमी वयात तरुणांमध्ये दिसू लागलाय. यामध्ये एकदा वजन वाढायला सुरुवात झाली की, त्यामुळे हाय ब्लड प्रेशर, डायबेटीस, कोलेस्ट्रॉलसारख्या समस्या निर्माण होतात. या सगळ्या गोष्टी थेट हृदयावर परिणाम होतो. एवढंच नाही तर आजकालच्या आहारात हृदयासाठी उपयुक्त असणारे पोषणतत्त्वंही कमीच असतात.
आजच्या तरुण पिढीसमोर मानसिक आरोग्याचाही मोठा प्रश्न आहे. सततचा ताण, चिंता किंवा नैराश्य या गोष्टी फक्त मनापुरत्याच नाहीत, तर त्या शरीरावरही परिणाम करत असतात. तणावामुळे शरीरात ‘कॉर्टिसॉल’ नावाचं स्ट्रेस हार्मोन वाढतं, जे रक्तदाब वाढवू शकतं. अशा तणावग्रस्त अवस्थेत अनेक जण धूम्रपान, दारू किंवा व्हेपिंगसारख्या वाईट सवयी जोपासतात.
काही लोकांना लहान वयातच हार्ट अटॅक येण्यामागे त्यांच्या जनुकांचाही समावेश असू शकतो. ‘फॅमिलियल हायपरकोलेस्टेरोलिमिया’ नावाची स्थिती काहींमध्ये अनुवंशिक स्वरूपात असते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल लहान वयातच खूप वाढतो. ही गोष्ट वेळेत ओळखली गेली तर नियंत्रणात येऊ शकते, पण अनेक वेळा ती लक्षातच येत नाही.
तरुण वयात आजारी पडण्याची शक्यता कमी असल्यामुळे बरेच लोक आरोग्याच्या टेस्ट करून घेत नाही. पण हेच दुर्लक्ष गंभीर समस्या निर्माण करू शकतं. दरवर्षी एकदातरी ‘हार्ट चेकअप’, बीपी, ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉल यांची तपासणी केली पाहिजे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.