मधुमेह ही गंभीर आरोग्याची समस्या असून गेल्या काही वर्षांमध्ये या समस्येचे रूग्ण संपूर्ण जगभरात वाढताना दिसतायत. मधुमेह बरा होऊ शकत नाही, मात्र औषधे आणि जीवनशैलीतील बदलांच्या मदतीने नियंत्रित केला जातो. या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन मानला जातो.
टाइप 2 मधुमेह जो पारंपारिकपणे वृद्ध किंवा प्रौढ व्यक्तींमध्ये दिसून येतो. मात्र गेल्या काही काळापासून लहान मुलं आणि तरूणांमध्येही ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. कमी वयात ही समस्या जडण्यामागे काय कारणं आहेत, ही तज्ज्ञांनी स्पष्ट केली आहेत.
मुंबईच्या जे.जे रूग्णालयातील मेडिसिन विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मधुकर गायकवाड म्हणाले की, सध्या कमी वयातील व्यक्तींमध्ये देखील मधुमेहाचं प्रमाण वाढताना दिसतंय. या समस्येची अनेक कारणं असू शकतात, ज्यामध्ये जीवनशैलीतील बदल, आहाराच्या सवयी आणि इत्यादींचा समावेश आहे. लहान मुलं आणि तरूणांमध्ये मधुमेहाच्या समस्येचं प्रमाण वाढत चाललंय. ही समस्या टाळायची असेल तर योग्य आहार, शारीरिक हालचाल या गोष्टी काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे.
तरुणांमध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे चुकीची जीवनशैली. स्मार्टफोन, व्हिडिओ गेम्स यांचा वापर वाढल्यामुळे शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. अनेक जण व्यायाम किंवा मैदानी खेळ खेळत असूनही तासनतास बसून राहतात. अशा परिस्थितीत वजन वाढू शकते, ज्यामुळे इन्सुलिन प्रतिरोधकपणाचा धोका वाढतो, जो टाइप 2 मधुमेहाच्या विकासासाठी एक प्रमुख घटक मानला जातो.
खाण्याच्या सवयी हे देखील मधुमेहाचं प्रमुख कारण मानलं जातं. सध्याच्या खाण्याच्या सवयी जसं की, प्रोसेस्ड फूड, साखरयुक्त पेये आणि फास्ट फूडमुळे तरुणांमध्ये मधुमेहाचा धोका वाढतो. या खाद्यपदार्थांमध्ये शुद्ध साखर आणि अस्वास्थ्यकर चरबी भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू लागते. कालांतराने, साखरेचं प्रमाण जास्त आणि पोषण कमी यामुळे लठ्ठपणा आणि चयापचय विकार होऊ शकतात, ज्यामुळे मधुमेहाची सुरुवात होऊ शकते.
आजकाल तरुणांमध्ये लठ्ठपणा झपाट्याने वाढत असून त्यामुळे मधुमेहाचा धोकाही वाढतो. लठ्ठपणा हा टाइप 2 मधुमेह होण्यासाठी सर्वात मोठा जोखीमीचा घटक आहे. शरीरातील अतिरीक्त चरबी इन्सुलिनचा प्रतिकार वाढवू शकते.
मधुमेहामध्ये जीवनशैली घटक महत्त्वाची भूमिका बजावत असली तरी अनुवांशिक घटक आणि कौटुंबिक इतिहास यामुळे देखील ही समस्या मागे लागू शकते. ज्या तरुणांना मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास आहे त्यांना या आजाराचा जास्त धोका असतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.