

नेत्ररोगतज्ज्ञ म्हणून माझ्या निदर्शनास येत आहे की, आजकाल अनेक मुलांमध्ये अगदी लहान वयातच मायोपिया (दूरदृष्टीचा दोष/शॉर्ट साइटेडनेस) विकसित होत आहे. मायोपिया असलेल्या मुलांना जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात, मात्र दूरच्या वस्तू पाहताना अडचण येते. फक्त चष्मा लागणे हीच चिंतेची बाब नाही, तर वाढत्या वयानुसार अनेक मुलांचा चष्म्याचा नंबर सातत्याने वाढत असल्याचेही दिसून येत आहे.
डॉ. हसनैन शिकारी, Consultant Ophthalmologist Saifee Hospital यांच्या मते, मायोपिया होण्यामागे आनुवंशिक कारणांचा वाटा असला, तरी आजची बदलती जीवनशैलीही त्यासाठी तितकीच जबाबदार आहे. आजची मुले अभ्यास, वाचन तसेच मोबाईल आणि टॅबलेटचा वापर यामुळे बराच वेळ जवळच्या अंतरावर लक्ष केंद्रित करून घालवतात, तर मैदानी खेळ आणि घराबाहेरचा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. दीर्घकाळ जवळच्या अंतरावर वाचन किंवा स्क्रीनचा वापर केल्याने डोळ्यांवर सतत ताण येतो. याशिवाय, नैसर्गिक सूर्यप्रकाशात पुरेसा वेळ न घालवल्यामुळेही मायोपियाचा धोका वाढू शकतो.
पालकांनी काही सोप्या सवयी अंगीकारल्यास मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी मोठा फायदा होऊ शकतो. मुलांनी दररोज किमान १ ते २ तास मैदानी वातावरणात वेळ घालवावा. अभ्यास किंवा स्क्रीनचा दीर्घकाळ वापर करताना नियमित विश्रांती घेऊन काही क्षण दूरच्या वस्तूकडे पाहण्याची सवय लावावी. पुस्तके किंवा स्क्रीन चेहऱ्याच्या अगदी जवळ धरू नयेत, तर योग्य अंतरावर ठेवावीत. तसेच, वाचन करताना पुरेसा प्रकाश असणेही आवश्यक आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये स्क्रीन टाइम हा मैदानी खेळांची जागा घेऊ नये.
पालकांनी काही लक्षणांकडे विशेष लक्ष द्यावे. उदाहरणार्थ, मूल टीव्हीच्या खूप जवळ बसत असेल, पुस्तक अगदी जवळ धरून वाचत असेल, वारंवार डोळे बारीक करून पाहत असेल किंवा वर्गातील फळ्यावरचे स्पष्ट दिसत नसेल, तर त्वरित नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
विशेषतः आई किंवा वडिलांपैकी कोणालाही मायोपिया असल्यास, मुलांची डोळ्यांची तपासणी लवकर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मायोपियाचे लवकर निदान झाल्यास कमी मात्रेतील अॅट्रोपिन आय ड्रॉप्स, तसेच मायोपिया कंट्रोलसाठी विशेष चष्मे किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेस यांच्या मदतीने त्याची प्रगती काही प्रमाणात कमी करता येऊ शकते. स्क्रीनचा वापर पूर्णपणे बंद करणे हा उपाय नाही. मात्र, अभ्यास, स्क्रीनचा वापर आणि मैदानी खेळ यामध्ये योग्य समतोल राखणे हे मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.