

अचानक रक्तातील साखरेचं प्रमाण 278 mg/dL पर्यंत वाढलं तर कोणालाही भीती वाटू शकते. मात्र अशा वेळी घाबरून जाण्याऐवजी योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे. रक्तातील साखर वाढण्याच्या या स्थितीला हायपरग्लायसेमिया (Hyperglycemia) असं म्हणतात. रक्तातील साखर वारंवार वाढत असेल आणि त्याकडे दुर्लक्ष केले, तर किडनी, फुफ्फुसं आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्याचं लक्षात आल्यास योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे.
अनेकदा रक्तातील साखर वाढल्यावर लोक इंटरनेटवर वाचलेले घरगुती उपाय करतात किंवा डॉक्टरांना न विचारता औषधांची मात्रा वाढवतात. मात्र, असं करणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे स्वतःच्या मनाने कोणतेही उपाय करण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच पुढील पावलं उचलावीत.
परेलच्या ग्लेनीगल्स हॉस्पिटलच्या फिजिशियन आणि मधुमेहतज्ज्ञ डॉ. आरती उल्लाल यांनी एका बेवसाईटला माहिती देताना सांगितलं की, रक्तातील साखरेचं प्रमाण 278 mg/dL असणं हे सामान्यपेक्षा जास्त आहे. अशा वेळी घाबरून न जाता रक्तातील साखर पुन्हा तपासणं, शरीरात पाण्याची कमतरता होऊ न देणं आणि गरजेनुसार डॉक्टरांशी संपर्क साधणं महत्त्वाचं आहे.
रक्तातील साखरेचं प्रमाण 278 mg/dL दिसल्यास सर्वप्रथम ती तपासणी पुन्हा करून पाहावी. यासाठी हात साबणाने स्वच्छ धुवून चांगले कोरडे करावेत. त्यानंतर नवीन टेस्ट स्ट्रिप वापरून पुन्हा रक्तातील साखरेची तपासणी करावी.
दुसऱ्यांदा तपासणी केल्यानंतरही साखरेचं प्रमाण जास्त दिसत असेल तर शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. पुरेसं पाणी प्या. शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राहण्यास यामुळे मदत होते. मात्र, केवळ पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात येईलच असं नाही. त्यामुळे साखरेचं प्रमाण जास्तच राहत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जेवणानंतर रक्तातील साखरेचं प्रमाण किती आहे हे समजून घेताना तपासणी नेमकी कधी केली, हे पाहणं महत्त्वाचं असतं. जेवल्यानंतर लगेच केलेली तपासणी आणि जेवणानंतर काही वेळाने केलेली तपासणी यांचे आकडे वेगवेगळे असू शकतात. शिवाय त्या व्यक्तीला मधुमेह आहे का, रक्तातील साखरेचं नेहमीचं प्रमाण किती असतं आणि कोणती औषधे घेतली जातायत याचाही विचार करावा लागतो.
मात्र, डॉ. आरती उल्लाल यांच्या मते, रक्तातील साखरेचं प्रमाण 278 mg/dL असणं हे जास्त आहे. ही तपासणी रिकाम्या पोटी, जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर केली असली, तरी या आकड्याकडे दुर्लक्ष करू नये. योग्य वेळी पुन्हा तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यावर काही लक्षणं दिसू शकतात. ही लक्षणे जाणवत असतील, तर परिस्थिती गंभीर होण्याची वाट न पाहता लगेच डॉक्टरांकडे धाव घ्यावी.
खूप तहान लागणं
वारंवार लघवीला जावं लागणं
उलट्या होणं
पोटात दुखणं
खूप अशक्तपणा जाणवणं
गोंधळल्यासारखे होणे किंवा नीट विचार करता न येणं
असामान्यपणे झोप येणे किंवा खूप सुस्ती जाणवणं
श्वास घेण्यास त्रास होणं
यापैकी गंभीर लक्षणे दिसत असतील, तर तातडीने रुग्णालयात जावे. रुग्णाला पाणीही पिता येत नसेल, वारंवार उलट्या होत असतील, तो गोंधळलेल्या अवस्थेत असेल किंवा खूप सुस्त झाला असेल, तर उशीर करू नये.
इंटरनेटवरील घरगुती उपाय लगेच करू नका
साखर जास्त असताना व्यायाम करताना काळजी घ्या
आहारातून कार्ब्स पूर्णपणे बंद करू नका
स्वतःच्या मनाने औषधांची मात्रा वाढवू नका
साखर सतत वाढत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा
रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात. काही वेळा दैनंदिन जीवनातील बदलांमुळेही असे घडू शकते.
शरीरात एखादा आजार किंवा संसर्ग झाल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.
जास्त ताण घेतल्यानेही रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो.
मधुमेहाची औषधे वेळेवर न घेतल्यास किंवा औषधांची मात्रा चुकल्यास साखर वाढू शकते.
आहारात बदल झाल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.
दिवसभर बसून राहणं किंवा शारीरिक हालचाली कमी झाल्यानेही रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो.
पुरेसे पाणी न प्यायल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. याचाही रक्तातील साखरेच्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो.
काही औषधांमुळे रक्तातील साखर वाढू शकते. त्यामुळे तुम्ही घेत असलेल्या औषधांचा आढावा डॉक्टरांकडून घेणं गरजेचं आहे.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.