

आजकाल अनेकांना हाय बीपीचा त्रास झाल्याचं पाहायला मिळतं. उच्च रक्तदाबाची समस्या सुरुवातीला फारशी जाणवत नाही. मात्र हळूहळू त्याचा परिणाम हृदय, किडनी आणि शरीराच्या इतर भागांवर होऊ शकतो. त्यामुळे बीपी नियंत्रणात ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. यासाठी अनेक जण औषधांचा आधार घेतात. पण औषधांसोबतच जीवनशैलीत काही बदल केले आणि सकाळच्या काही चांगल्या सवयी लावल्या, तर बीपी नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
पुण्यातील जनरल फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ. शालिनी सिंह साळुंखे यांनी सांगितलं की, आपल्या घरात सहज मिळणाऱ्या काही पदार्थांचा वापर करून तुम्ही बीपी नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
डॉ. शालिनी यांच्या मते, बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी एक खास ड्रिंक फायदेशीर ठरू शकतं. हे ड्रिंक तयार करण्यासाठी बीट, जवस, दालचिनी आणि आलं या चार पदार्थांची गरज आहे. सकाळी रिकाम्या पोटी हे ड्रिंक प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकतं. बीटामध्ये नायट्रेट्स नावाचं घटक असतात. हे घटक रक्तवाहिन्या सैल होण्यास मदत करतात. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.
जवसमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते. हे घटक हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात. तर दालचिनीमुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. तर आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि सूज कमी करण्यास मदत करणारे गुण असतात. हे गुण हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.
हे ड्रिंक बनवण्यासाठी जास्त साहित्याची गरज नाही. घरात सहज मिळणाऱ्या चार पदार्थांपासून तुम्ही हे तयार करू शकता.
१०० ग्रॅम बीटाचा रस
१ चमचा भाजून बारीक केलेले जवस
पाव चमचा दालचिनी पावडर
अर्धा ते १ चमचा आल्याचा रस
हे सर्व पदार्थ एका ग्लासमध्ये एकत्र करून चांगलं मिसळा. अशा पद्धतीने तुमचं बीपीसाठी खास ड्रिंक तयार होईल. हे ड्रिंक दररोज सकाळी पिण्यास सुरुवात करा. यामुळे रक्तदाब कमी करण्यास मदत होऊ शकते.
हाय ब्लड प्रेशरला वैद्यकीय भाषेत हायपरटेन्शन (Hypertension) असं म्हणतात. या स्थितीत रक्तदाब सामान्य पातळीपेक्षा जास्त राहतो. सामान्य रक्तदाब साधारणपणे १२०/८० असू शकतो. यामध्ये पहिला आकडा म्हणजे सिस्टोलिक आणि दुसरा आकडा म्हणजे डायस्टोलिक रक्तदाब.
हाय ब्लड प्रेशरच्या पहिल्या टप्प्यात सिस्टोलिक रक्तदाब १३० ते १३९ आणि डायस्टोलिक रक्तदाब ८० ते ८९ दरम्यान असतो. तर दुसरा सिस्टोलिक रक्तदाब १४० किंवा त्यापेक्षा जास्त आणि डायस्टोलिक रक्तदाब ९० किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो. ज्यावेळी तुमचा रक्तदाब १८०/१२० पर्यंत पोहोचतो तेव्हा ती परिस्थिती धोक्याची मानली जाते.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.